लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : उपजिल्हा रूग्णालयात लावलेली शुद्ध व थंड पाण्याची यंत्रणा मागील तीन दिवसांपासून बंद पडली आहे. शासकीय रूग्णालयात उपचार मोफत मिळत असले तरी रुग्ण व आप्तेष्टांना हॉटेलांतून पाणी विकत घ्यावे लागत आहे.उपजिल्हा रुग्णालयाला वरोरा शहर, माढेळी, नागरी, कोनरसार, सावरी हे आरोग्य केंद्र तर शेगाव, टेमुर्डा येथील आरोग्य उपकेंद्र जोडण्यात आले आहेत. यासोबतच माजरी, वरोरा, शेगाव पोलीस ठाणेही उपजिल्हा रुग्णालयाला जोडले गेले आहे. नागपूर- चंद्रपूर राज्य मार्ग, नवी दिल्ली- चेन्नई रेल्वे मार्गावर अपघात झाल्यास याच उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले जातात. ओपीडीमध्ये दररोज शेकडोे रुग्णांवर उपचार होतो. शिवाय, शेकडो शस्त्रक्रियाही केल्या जातात. यामुळे उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या आप्तेष्टांची मोठी गर्दी असते. पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे याकरिता रुग्णालयातील शुद्धीकरण संयंत्र बसविण्यात आले आहे. परंतु, तिनही संयंत्र मागील तीन दिवसांपासून बंद आहेत. पाण्याची पातळी खोलवर गेल्याने पुरेसे पाणी मिळत नाही. ही परिस्थिती मागील काही दिवसांपासून कायम असताना रुग्णालय प्रशासनाने पर्यायी उपाययोजना केली नाही. परिणामी, रुग्णांना शुद्ध व थंड पाणी मिळावे दुरापास्त झाले आहे. दररोज शेकडो रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात मोफत केले जात असले तरी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता तालुक्यातील सर्वसामान्य गरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यांना आता पिण्याचे पाणी मिळविण्याकरिता हॉटेलांत जावे लागत आहे.पाणी ही मूलभूत गरज असताना संबंधित अधिकाऱ्यांनी शुद्धीकरण संयंत्रांची दुरूस्ती करून समस्या सोडविली नाही. गावखेड्यातून आलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागत असून आर्थिक भुर्दंड बसत आहे. नागरिक नाराज आहेत. उपाययोजनेसंदर्भात जाणून घेण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोराचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन सातभाई यांच्याशी संपर्क साधला. पण होऊ शकला नाही.ओपीडीमध्ये शेकडो रुग्णांची गर्दीउपजिल्हा रूग्णालयाच्या ओपीडीमध्ये दररोज शेकडो रूग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णांमध्ये सर्वसामान्यांची संख्या अधिक आहे. रूग्णांवर निशुल्क उपचार केले जाते. परंतु, पाण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. पाण्याची मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
उपजिल्हा रुग्णालयात विकत घ्यावे लागते पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:10 PM
उपजिल्हा रूग्णालयात लावलेली शुद्ध व थंड पाण्याची यंत्रणा मागील तीन दिवसांपासून बंद पडली आहे. शासकीय रूग्णालयात उपचार मोफत मिळत असले तरी रुग्ण व आप्तेष्टांना हॉटेलांतून पाणी विकत घ्यावे लागत आहे.
ठळक मुद्देजलशुद्धीकरण संयंत्र बंद : रूग्णांचे नातेवाईक हैराण