वरोऱ्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पाच पदे रिक्त : जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा हे एकमेव असे शहर असून जेथून यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा शहराकडे जाण्याचा मार्ग आहे व नियमित बससेवाही उपलब्ध आहेत. महामार्गावर वर्दळ राहत असल्यामुळे दररोज अपघात घडत असतात. त्या रूग्णांना येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते. मात्र येथील उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पाच पदे रिक्त असून केवळ दोन डॉक्टरांच्या भरवश्यावर येथील कारभार सुरू आहे. वरोरा शहर हे चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगीक वसाहतीचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. राज्य महामार्गावर वसलेले हे शहर तीन जिल्ह्याचा मध्यभागी आहे. त्यामुळे येथे पन्नास खाटांचे उपजिल्हा रूग्णालय आहे. पण ‘नाम बडे और दर्शन खोटे’ अशी परिस्थिती या रुग्णालयाची झाली आहे. येथील अनेक पदे रिक्त आहेत. तर महत्त्वाचे पद असलेले वैद्यकीय अधिकारी यांची संख्या सात असताना पाच जागा अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णाची गैरसोय होत आहे. याकडे पालकमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले असून जिल्हा प्रशासनानेही लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. गेल्या एक वर्षापासून उपजिल्हा रुग्णालयात रिक्त पदांचे ग्रहण लागले असून जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणारे लोकप्रतिनिधीही मात्र गप्प का? असा सवालही आता नागरिक विचारू लागले आहेत. आज शहराची लोकसंख्या पन्नास हजाराचा वर आहे. परंतु, उपजिल्हा रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खांद्यावर येथील कारभार सुरू आहे. सहायक वैद्यकीय अधिक्षक, कनिष्ठ लिपीक आणि लॅब अटेन्डेन्ट, एक स्टाफ नर्स, दोन इंचार्ज सिस्टर तर चार परिचरच्या जागाही रिक्त आहे. त्यामुळे रुग्णांचा उपचाराकरिता अडचणी येत असून याबाबत आरोग्य विभाग व राज्य शासनाला वारंवार लक्षात आणून देऊनही रिक्त पदे भरण्याकरिता कोणत्याही हालचाली झालेल्या नाही. त्यामुळे नागरिकांत रोष पसरला आहे. (शहर प्रतिनिधी)रिक्त पदांमुळे आम्हालाही त्रास सहन करावा लागत आहे. एमएलसी, ओपीडी, इमरजेसी रुग्ण असतात. मात्र दोन डॉक्टरांना सर्व काम करावी लागत आहे. दोन डॉक्टरांच्या भरवश्यावर दवाखाना चालू शकत नाही. लवकरात लवकर रिक्त पदे भरायला हवे किंवा डिपुटेशनला गेलेल्या डॉक्टरांना परत बोलाविणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे.- गो.वा. भगत, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, वरोरा
दोन डॉक्टरांवर उपजिल्हा रुग्णालयाचा भार
By admin | Published: June 14, 2016 12:38 AM