कोरपना : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधनात्मक कार्य श्री गुरुदेव सेवा मंडळ अखंडपणे जपत आहे. यातील वयोवृद्ध सेवेकरी मारुती कोंडबा आत्राम गेल्या चार दशकांपासून हा वसा कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या जांभूळधरा भागात अविरत सेवेच्या रूपाने करीत आहेत.
आत्राम हे मूळचे आर्णी तालुक्यातील सेलू अंजनखेड गावचे. अगदी बाल वयापासूनच राष्ट्रसंतांच्या विचारांनी ते प्रेरित होते.
१९८४ मध्ये त्यांची उच्चविद्याविभूषित दोन मुले, नंतर पत्नी, त्यानंतर तर काही काळातच एका मुलीचा आजारपणाने अकाली मृत्यू झाला. यानंतर मारुती आत्राम यांनी वैराग्य पत्करले. शिवगड झमकोला, महागाव उटनूर (तेलंगणा), असे फिरत त्यांनी प्रशिक्षण शिबिर घेणे सुरू केले. १९९४ ला जांभूळधरा भागात आल्यानंतर ते येथे झोपडीवजा घर बांधून स्थिरावले. दरम्यान, त्यांनी श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे या भागात प्रचार प्रसाराचे कार्य सुरू केले. प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यास सुरुवात केली, तसेच अन्य ठिकाणी जाऊनही ते लाठी-काठी, जंबिया, मल्लखांब, कुस्ती, भालाफेक आदीचे प्रशिक्षण देतात. वयाने ऐंशी गाठली तरीही त्यांचा तसूभर ही सेवेतील उत्साह कमी झालेला नाही. सतत त्यांचे या कार्यासाठी दूरपर्यंत भ्रमण सुरू असते. महाराष्ट्रासह पंजाब, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यांतही त्यांनी आजवर प्रशिक्षण दिले आहे.