वढोली : सोमवारी ‘लोकमत’ने पुलाच्या बांधकामाकरिता चक्क नदीपात्रातून रेतीची चोरी हा तारड्यातील प्रकार समोर आणला होता. गोंडपिपरी तालुक्यातील तारडा गावातून पोंभुर्णा तालुक्याच्या सीमेला जोडणाऱ्या एका मोठ्या पुलाच्या निर्मितीचे काम शासनाने हाती घेतले आहे. सदर पुलाच्या कामासाठी दोन ते तीन यांत्रिक मशीनद्वारे नदीपात्रातून उपसून ती रेती नदीच्या तीरावर पुलाच्या साइटवर टाकण्यात आली. नदीकाठावर अंदाजे ४०० ब्रास रेतीसाठा जमा करण्यात आला. प्रस्तुत प्रतिनिधीने याचे छायाचित्र सोमवारी काढले. गुरुवारी अचानक ती रेती गायब झाल्याचे दिसून आले.
गोंडपिपरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती साठा आहे. असे असताना एकाही घाटाचा लिलाव झाला नाही. महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने वारेमाप उचल होत असल्याने महसूल विभागाचा महसूल बुडत आहे. यात महसूल विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांचे हात ओले होत असल्याची स्थानिकांत चर्चा आहे.
एकीकडे घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही. दुसरीकडे एकाच दिवशी ४०० ब्रास रेती अवैध साठवणूक होऊन दोन दिवसांत गायब होते. त्यामुळे अधिकारी झोपले आहेत काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.