अधिकाऱ्यांची उपस्थिती : चंद्रपूर, बल्लारपूर, मूल व वर्धा बसस्थानकासाठी निधीची तरतूदचंद्रपूर: वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर, बल्लारपूर, मूल तसेच वर्धा येथील बसस्थानकांच्या आधुनिकीकरणाच्या कार्यवाहीचा शुक्रवारी आढावा घेतला. स्थानिक शासकीय विश्रामगृहात राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि आर्किटेक्ट यांच्यासह झालेल्या बैठकीत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सदर बसस्थानकांचे डिझाईन्स बघून त्यात काही सुधारणा सुचविल्या . याबाबतची कार्यवाही जलदगतीने पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ही सर्व बसस्थानके उत्तम दर्जाची तसेच अत्याधुनिक स्वरूपाची होतील, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या .ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील चंद्र्रपूर, मुल आणि बल्लारपूर येथील बसस्थानकांचे आधुनिकीकरण व दर्जा वाढ करण्यासाठी १३ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या बसस्थानकांच्या आधुनिकीकरणाअंतर्गत बांधकाम, पुनर्बांधणी, विस्तारीकरण व दजार्वाढ या संबंधीच्या प्रस्तावाला गृह विभागाच्या १४ मार्चच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता दिली. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. याघोषणेला अनुसरून वर्धा, चंद्रपूर , मुल आणि बल्लारपूर येथील बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. यात चंद्रपूर येथील बसस्थानकासाठी सहा कोटी १८ लाख रुपये, मुल येथील बसस्थानकासाठी दोन कोटी २६ लाख रुपये आणि बल्लारपूर येथील बसस्थानकासाठी पाच कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. वर्धा येथील बसस्थानकासाठी पाच कोटी ४३ लाख रुपये निधी मंजुर करण्यात आला आहे .बैठकीला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल , जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले, राज्य परिवहन महमंडळाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले , विभागीय अभियंता राहुल मोडक, विभाग नियंत्रक सहारे, आर्किटेक्ट देशमुख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला बसस्थानक आधुनिकीकरणाच्या कामाचा आढावा
By admin | Published: May 01, 2016 12:31 AM