चंद्रपूर - गेल्या चार वर्षांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 30 हजार हेक्टर सिंचनाची वाढ झाली आहे. चांदा ते बांदा योजनेतून शेकडो बांध उभे राहणार आहेत. लवकरच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला सिंचन क्षमता वाढवण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या चिचडोह प्रकल्पाचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सर्व सुविधा उपलब्ध करत असताना गरीब शेतकरी, शेतमजूरांच्या जीवित्वाची जबाबदारी आता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून घेण्याची घोषणा आज मी करत असून चंद्रपूर जिल्ह्यातील 70 हजार शेतकरी, शेतमजूर यांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून आयुष्यभराचा विमा काढला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेला ते संबोधित करत होते. जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात सुरू केलेल्या विशेष उपक्रमांचा यावेळी त्यांनी उल्लेख केला. ही वाघांची आणि पराक्रमाची भूमी असल्यामुळे येथील युवकांनी वाघाप्रमाणे पराक्रम गाजवावा आणि भारतामध्ये या जिल्ह्याचे नाव अग्रकमाने घेतले जाईल, असे कार्य करावे अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या. प्रत्येक क्षेत्रात विशेष कार्य करून देशसेवा घडू शकते असे त्यांनी यावेळी सांगितले ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मिशन शौर्य गाजवणाऱ्या मुलांचे कौतुक केले. ज्यांनी कधी विमान बघितले नाही अशा आदिवासी विद्यार्थ्यांनी विमानाच्या उंचीवरील एव्हरेस्ट सर करून चंद्रपूरचे नाव देखील अजरामर केले. यावेळी त्यांनी युवकांनी मिशन सेवा अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन शासकीय नोकरीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मुलांचा टक्का वाढविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमांमध्ये या मोहिमेची सुरुवात करण्यात आली असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वाचनालय उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मिशन सेवा सोबतच आता मिशन शक्तीच्या माध्यमातून भारतमातेच्या चरणी ऑलम्पिक मेडल मिळवणाऱ्यात चंद्रपूर-गडचिरोलीचे विद्यार्थी असावे, यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये क्रीडा संकुल उभारत असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूरमध्ये ज्युबिली हायस्कूलच्या मागे वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाचे क्रीडा संकुलाचे लवकरच उद्घाटन करत असल्याचे त्यांनी यावेळी घोषणा केली.
जिल्ह्यामध्ये रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी यापुढे जिल्हा पोलीस प्रशासन घेईल असे सांगताना त्यांनी 'आम्ही घेतो काळजी महिला-मुलींची ' या घोषणे अंतर्गत जिल्ह्यामध्ये पोलीस नियंत्रण कक्षाची स्थापना केली जाईल. महिला हेल्पलाईन व वॉटस्ॲप नंबर देण्यात येईल. आवश्यकता असतांना पोलिसांचे संरक्षण, पोलिसांचे वाहन, रात्रपाळीतील महिलांना दिले जाईल, असेही स्पष्ट केले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन, प्रशासन खंबीरपणे उभे असल्याचे सांगून त्यांनी जिल्हयातील 70 हजार गरीब शेतकरी, शेतमजूरांचा विमा काढणार असल्याचे सांगितले. 12 रुपये वर्षाला देखील अनेक शेतकरी भरु शकत नाही. मात्र संकटकाळात व दुर्देवी घटनात विमाच काढला नसल्याचे पुढे येते. त्यामुळे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून जिल्हा प्रशासन अशा शेतक-यांचा आयुष्यभराचा विमा काढेल, अशी घोषणा त्यांनी केली.
गेल्या वीस तारखेला कर्तव्यावर असताना वीरमरण आलेले पोलीस कर्मचारी प्रकाश मेश्राम यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या कुटुंबीयांना दिला. यावेळी जिल्ह्यामध्ये कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या छत्रपती चिडे यांचेही स्मरण यावेळी त्यांनी केले.