कोरोना उद्रेकामुळे जिल्ह्यातील हजारो लोकांचे रोजगार बुडाले. व्यवसाय कोलमडले. अनेकांच्या उदरनिर्वाहाची साधने उद्ध्वस्त झाली. जुने व्यवसाय बंद करून दारोदारी भटकून जीवनाेपयोगी किरकोळ वस्तू विक्री करावी लागत आहे. यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या मोबदल्यातून कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले. कोरोना कहर सुरू असल्याने प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळात किती विक्री होईलच, याची खात्री नाही. त्यामुळे दीड महिन्यांपासून जिल्ह्यातील हजारो लघुव्यावसायिकांची प्रचंड आर्थिक ओढाताण सुरू आहे. या कालावधीत जिल्हा प्रशासनाने कोरोनाविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढविल्या. आरटीपीसीआर व अॅन्टिजन चाचण्यांची व्याप्ती वाढविली. त्यामुळे संसर्गाचा आलेख उतरणीला लागला. मृतांची संख्याही कमी होत आहे. पॉझिटिव्ही दर १० टक्क्यांपेक्षा खाली आणि ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या कमी झालेल्या २० जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल झाले. चंद्रपूर जिल्हा मात्र रेड झोनमध्ये आहे. त्यातच निर्बंधांना मुदतवाढ दिल्याने जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
लघुव्यवसायांवर कुठाराघात
जिल्हा प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांचा पॉझ बटनासारखा वापर केला. त्याची उपयुक्तताही सिद्ध होऊ लागली. परंतु गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक व लघुव्यवसायांवर या निर्बंधांचा प्रचंड आघात बसला आहे. त्यामुळे १५ जून २०२१ च्या सकाळी ७ वाजतापर्यंत आधीचे सर्व निर्बंध ‘जैसे थे’ ठेवल्याचे सोमवारी जाहीर होताच नागरिकांत नाराजी उमटत आहे.
हजारो कुटुंंबे आर्थिक तणावात
निर्बंध लागू केल्यानंतर कामगार, हमाल, हॉकर्स आणि अन्य लघुव्यावसायिकांच्या अर्थार्जनाची जबाबदारी घेण्यास सरकार कमी पडले. कार्डधारकांना धान्याची व्यवस्था हा अपवाद वगळल्यास पार काही मिळाले नाही. उद्योगांना शिथिलता देण्यात आली. पण कच्चा माल ते व्रिकीपर्यंतची साखळी विस्कळीत झाली. रोजगाराचे मार्ग बंद असल्याने हजारो कुटुंंबांमध्ये मोठा आर्थिक ताणतणाव वाढला.
हाताला कामच नाही; बेरोजगार वैतागले
कोरोना संसर्गापासून सुशिक्षित बेरोजगारांचे तर हाल सुरू आहेत. कौशल्यावर आधारीत रोजगार आणि नोकर भरती ठप्प आहे. नोकरीला पात्र असलेले शिक्षण पूर्ण करूनही कुठे संधी नाही. उद्याचे बघू; पण आजचा खर्च कसा भागवायचा, असा विचार करू पाहणाऱ्या बेरोजगारांना जिल्ह्यात सद्यस्थितीत कुठेच रोजगार नाही. त्यामुळे दीड दोन महिन्यांपासून तेही वैतागले असून निर्बंधांबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत.