लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: मुलींच्या जन्माचा टक्का वाढावा, कुठल्याही परिवारात मुलीचा जन्म झाल्यास तिचे स्वागत व्हावे, या हेतूने शासनाने मुलींच्या आई-वडिलांना लखपती करणारी 'सुकन्या समृद्धी योजना' सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाभरातील पोस्ट कार्यालयात मुलींच्या नावे खाते उघडली जात आहेत. योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत शेकडो मुलींचे खाते उघडण्यात आले असून, एका अर्थाने 'ती'च्या येण्याने आई-वडिलांचे जगणे समृद्ध झाले आहे.
पालकांनी वर्षाला किमान एक हजार रुपये महिना भरले, तरी १५ वर्षांत १ लाख ८० हजार रुपये खात्यावर जमा होतात. त्यानंतर पैसे भरण्याचीदेखील गरज नाही. २० वर्षांनंतर पैसे काढताना मात्र पालकांना परतावा म्हणून ५ लाख ५४ हजार ६१३ रुपये अशी मोठी राशी मिळते. त्यामुळे पालकांना मुलीच्या शिक्षणाची आणि लग्नाचीदेखील चिंता दूर होण्यास मदत होते; परंतु यासाठी मुलीच्या जन्मानंतर सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडून नियमित रक्कम भरण्याची गरज आहे.
असा आहे योजनेचा उद्देशयोजनेचा मुख्य उद्देश स्त्री भ्रूणहत्या रोखणे हा आहे. मुलीच्या जन्मापासून ती दहा वर्षाची होईपर्यंत मुलीच्या नावावर हे खाते उघडता येते.मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर जमा राशीमधून ५० टक्के रक्कम आणि मुलीचे वय २१ वर्षे झाल्यास तसेच मुलीचे लग्न झाल्यास पूर्ण जमा राशी काढता येऊ शकते.
सुकन्या समृद्धी योजनेची वैशिष्ट्येमुलीच्या उच्च शिक्षण, उज्ज्वल भविष्य व लग्नासाठी किमान २५० रुपयांत खाते उघडता येते. वर्षाला जास्तीत जास्त १ लाख ५० हजार रुपये भरता येतात. वयाच्या २१ वर्षांनंतर खाते बंद करता येते. मुलीच्या १८ व्या वर्षी जमा रकमेतून शिक्षणासाठी ५० टक्के रक्कम काढण्याची मुभा आहे. सध्याचा व्याजदर ८.२ टक्के आहे.
'बेटी बचाव - बेटी पढाव' मोहिमेच्या धोरणानुसार सुकन्या समृद्धी योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेला जिल्हाभरातून पालकांचा मोठा प्रतिसाद आहे. या योजनेत पालक आपल्या आर्थिक स्थितीनुसार बचत करू शकतो. मुलींचे शिक्षण आणि लग्न या कारणांसाठी रक्कम कामात येते. त्यामुळे पालकांची मुलीच्या भविष्याची चिंता मिटू शकते.
- आर.डी. धानफुले, प्रवर डाकपाल, चंद्रपूर