लोकमत न्यूज नेटवर्कचिंधीचक : पाण्याची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. अनेक शेतकऱ्यांना खरीप धान पिकापेक्षा रब्बी धान पिकाचे उत्पन्न जास्त झाले. परंतु नागभीड तालुक्यातील चिंधीचक येथील शेतकऱ्याच्या तीन एकर शेतातील धान पिकाला लोंबची न आल्याने कुतुहलाचा विषय ठरला असून शेतकऱ्याचे मात्र अतोनात नुकसान झाले आहे.चिंधीचक येथील विश्वनाथ सातपैसे, रेखा सातपैसे यांनी तीन एकर शेतीमध्ये उन्हाळी धान पिकाची लागवड केली. लागवडीसाठी श्री साई राईस मिल अड्याळमेंढा (जनकापूर) येथून ‘जोरदार’ हे धानाचे वाण खरेदी केले. वाणाची उगवण शक्ती व पोत चांगली होती. मात्र धान पिकाला १५० दिवस होवूनही सदर धान पीक गर्भअवस्थेत आले नाही. आता मात्र पावसाळ्याचे दिवस आले आणि धानाला लोबांच नाही, हे कळल्यावर या परिसरात कुतूहलाचा विषय ठरला आहे. मात्र शेतकऱ्याचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.या संदर्भात शेतकरी निवेदन घेवून कृषी विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडे जावून धानाला लोंब का आले नाही, याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र अजूनपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने पीक पाहण्यासाठी भेट दिली नाही. धान पिकाचे वाण पुरविणाऱ्या राईस मिल मालकानी फसवणूक केली असून शेतकऱ्याचे एक लाख रुपयाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे. त्यामुळे त्यांना भरपाई देण्याची मागणी होत आहे.
उन्हाळी धान पिकाला लोंबच नाही
By admin | Published: June 10, 2017 12:33 AM