प्रभाग चार मधील स्थिती : विहीर व हातपंपाचे पाणी दूषितगडचांदूर : अंमलनाला रस्त्यावरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोरील सार्वजनिक विहिर व हातपंपाना दूषित पाणी येत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. हे पाणी पिण्यास योग्य नसल्याने नगर परिषदेने या भागातील नागरिकांना माणिकगड सिमेंटच्या सहकार्याने टँकरने शुद्ध पाणीपुरवठा सुरू केला आहे.मुख्य रस्त्याच्या बाजूने नाली नसल्याने सांडपाणी साचून आरोग्याला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबतचे वृत्त प्रकाशित होतान नगर परिषद प्रशासन खळबळून जागे झाले. नालीचे बांधकाम तातडीने करुन साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावली. नगराध्यक्षा विद्या कांबळे, गटनेते पापय्या पोन्नमवार, आरोग्य सभापती हरिभाऊ मोरे, महिला बालकल्याण सभापती रेखा धोटे, नगरसेविका अरुणा बेतावार यांनी जातीने लक्ष देऊन सिमेंट नालीचे बांधकाम करून घेतले. विहिर व सार्वजनिक तसेच खासगी हातपंपाचे दुर्गंधी युक्त पाण्याचे नमूने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमके कारण कळणार आहे. मात्र सध्या या परिसरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी टँकरद्वारे दिवसातून दोनदा पुरविल्या जात आहे. (वार्ताहर)
उन्हाळ्यापूर्वीच गडचांदुरात टँकरने पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2016 1:15 AM