चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील अनेक महिन्यांपासून संडे मार्केट बंद होते. त्यामुळे येथे व्यवसाय करणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, मार्केट सुरू करण्यासंदर्भात सातत्याने
व्यावसायिकांनी प्रशासन तसेच पालकमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यानंतर रक्षाबंधनापासून हे मार्केट सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पहिल्या दिवशी ग्राहकांची गर्दी नसल्याचे दिसून आले.
सध्या कोरोना रुग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे शासन तसेच प्रशासनाने हळूहळू निर्बंध हटविणे सुरू केले आहे. यामध्येही तिसऱ्या लाटेची भीती कायम असल्यामुळे कोरोना नियम पाळणे बंधनकारक केले आहे. विशेष म्हणेज, सध्या रात्री १० वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास सूट देण्यात आल्यानंतर संडे मार्केट व्यावसायिकांनीही मार्केट सुरू करण्यासंदर्भात मागणी लावून धरली. त्यानंतर पालकमंत्र्यांकडेही मागणी करण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्तांनी निर्णय घेत संडे मार्केट सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर रक्षाबंधनापासून मार्केट सुरू करण्यात आले.