चिमूर : पत्नी आपणाला व आपल्या कुटुंबीयांना वारंवार मानसिक त्रास देत आहे. महिला अधिनियमाची धमकी देऊन हुंड्याच्या प्रकरणात अडकविण्याची भीती दाखवीत असते. यामुळे मी व माझे कुटुंबीय दहशतीत असल्याची माहिती तालुक्यातील वहानगाव येथील रूपेश नंदणवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासंदर्भात शेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पत्नीला नोटीस बजावल्याची माहितीही त्यांनी दिली.
रूपेश यांचे बुटीबोरी येथील लीना निनावेसोबत धार्मिक रीतीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. या लग्नाला पाच वर्षांचा कालावधी होत आहे. लग्न झाल्यानंतर लीना वहानगाव येथे रूपेशच्या घरी आली. प्रारंभी एक महिना कुटुंबाबरोबर चांगली वागली. त्यानंतर तिने नंदणवार कुटुंबातील व्यक्तींना क्षुल्लक कारणावरून त्रास देणे सुरू केले. यासंदर्भात सासर व माहेर दोन्ही पार्टीकडून लीनाला समजावण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर असे करणार नाही, असे कबूल केले. मात्र, तिच्या वागण्यात बदल झाला नाही. उलट कोणत्याही कारणावरून नंदणवार परिवाराला महिला अधिनियम कायद्याची भीती दाखवून हुंडाबळीच्या केसमध्ये फसविण्याची धमकी देणे तिने सुरू केले, असे नंदणवार यांनी सांगितले. एकदा एका क्षुल्लक कारणावरून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहितीही पीडित रूपेशने पत्रकार परिषदेत सांगितली. यासंदर्भात ६ मे रोजी शेगाव पोलीस स्टेशनला पत्नी लीनाच्या विरोधात तक्रार दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला रूपेश नंदणवार, शंकरराव नंदणवार, मंदा नंदणवार, दागेश नंदणवार, नितीन नंदणवार, पल्लवी नंदणवार आदी उपस्थित होते.
कोट
रूपेशने पत्नी लीनाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्रकरण कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्राकडे वर्ग केले आहे. पत्नी लीनाला नोटीस बजावली आहे. याबाबत ११ मे रोजी काउंसिलिंग होणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
-सुधीर बोरकुटे,
पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन, शेंगाव (बु).