चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात पुन्हा कोरोना संसर्ग वाढत आहे. स्थिती निश्चितच गंभीर झाली आहे. शहराच्या दैनंदिन व्यवहारात काही लोकांचा अनेकांशी दररोज संपर्क येतो. त्यांना सुपर स्प्रेडर म्हटले जाते. संसर्गाच्या काळात या सुपर स्प्रेडरनी अलर्ट राहणे आवश्यक आहे. मात्र, शहरात फेरफटका मारला असता, हे सुपर स्प्रेडरच नियमांच्या बाहेर जाऊन वागत असल्याचे दिसते. त्यामुळे कोरोना संसर्ग थांबण्याऐवजी आणखी झपाट्याने वाढत आहे.
मागील वर्षी २ मे रोजी चंद्रपुरात, पर्यायाने जिल्ह्यातच पहिला कोविडचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर, कोरोना संसर्गाची गती अतिशय कमी होती. मात्र, डिसेंबर महिन्यापासून कोविडच्या रुग्णात झपाट्याने वाढ होऊ लागली. ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा सहा हजारांहून अधिक गेला होता. त्यानंतर, आणखी संसर्ग कमी झाला. मात्र, आता मार्च महिन्यात पुन्हा संसर्ग वाढत आहे.
व्यावसायिक, किरकोळ दुकानदार, फेरीवाले, ऑटोरिक्षा चालक, भाजी विक्रेते, पानटपरी चालक, चहाटपरी चालक यांचा दररोज अनेक नागरिकांशी संपर्क येतो. प्रशासनिक भाषेत यांना सुपर स्प्रेडर म्हटले जाते. प्रशासनाने या सुपर स्प्रेडरना कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले. काहींनी केली, काहींनी नाही.
विशेष म्हणजे, या सुपर स्प्रेडरकडून संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करणे त्यांना अत्यंत आवश्यक आहे. मात्र, हेच सुपर स्प्रेडर कोरोनाच्या एकाही नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसते. चेहऱ्यावर मास्क नसतो, दुकानासमोरच वाट्टेल तिथे थुंकणे, सोशल डिस्टन्स न पाळणे सर्रास सुरू आहे. प्रशासनालाही शहरात फेरफटका मारला, तर हे दिसून येईल. मात्र, त्यांच्याकडूनही याकडे विशेष लक्ष दिले जात नाही.
बॉक्स
पहिल्या लाटेत नागरिक होते गंभीर
कोरोनाची पहिली लाट आली, तेव्हा नागरिक कोरोनाबाबत काहीसे गंभीर होते. त्यावेळी लसही उपलब्ध व्हायची होती. मात्र, आता लस आली असली, तरी कोरोना संसर्गही वाढत आहे. मात्र, या दुसऱ्या लाटेत नागरिकही फारसे गंभीर दिसत नाही. ही बेफिकिरी आरोग्याच्या दृष्टीने हितावह नाही.
बॉक्स
ना भीती, ना वचक
काही सूज्ञ नागरिक सुपर स्पेडरना मास्क लावण्याविषयी वारंवार सांगतात. मात्र, ते ऐकत नाही. आपल्याला काही कोरोना-बिरोना होत नाही, असे त्यांच्याकडून ठासून सांगितले जाते. त्यांना स्वत:लाच संसर्गाची भीती दिसत नाही आणि प्रशासनाचाही त्यांच्यावर वचक नाही.