चंद्रपूर: पडोली (जुनी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गुरुवारी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम पार पडला. मिना राजू मंच, शालेय व्यवस्थापन समिती आणि गावकरी मंडळीच्या संयुक्त विद्यमाने या प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे मुख्य वक्ते अ.भा. अनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप अडकिणे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक विलास गौरकार, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष जया पाटील, विजय मासीटकर, वासुदेव वाढई, भारती सोनुले व धनपाल फटींग हे उपस्थित होते. प्रदीप अडकिणे यांनी उपस्थितांसमोर दगड तरंगविणे, दोरी ताठ करणे, फुग्यातून टाचणी टाकणे, प्याला काठीने उचलणे, जळता कापूर खाणे आदी चमत्कारीक प्रयोग सादर करुन त्या मागच्या वैज्ञानिक कारणांचा उलगडा करुन दाखविला व उपस्थितांना अंधश्रद्धा व बूवाबाजीपासून दूर राहण्याचे आवाहन केले. गटशिक्षणाधिकारी धनपाल फटींग यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज काय, यावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे औचित्य साधून विभिन्न स्पर्धेच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले. त्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास गौरकार तर आभार प्रदर्शन भारती सोनुले यांनी केले. कार्यक्रमाला संपूर्ण विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग आणि गावकरी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम
By admin | Published: September 21, 2015 12:52 AM