जिल्हा रुग्णालयात पार्किंगची समस्या
चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेकजण येत असतात. मात्र येथे वाहने पार्क करण्यासाठी पैसे आकारण्यात येतात. रुग्णांचे नातेवाईक अडचणीत असतात. त्यातच त्यांच्याकडून दहा रुपये पार्किंग शुल्क आकारण्यात येते. ही बाब चुकीची असल्याने शुल्क घेणे बंद करावे, अशी मागणी होत आहे.
उघड्यावरील अन्नपदार्थांकडे दुर्लक्ष
चंद्रपूर : सध्या पावसाचे दिवस सुरू आहे. त्यातच शहरात अस्वच्छतेच्या वातावरणात अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मागील काही दिवसात जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे.
वीज पुरवठा अखंडित सुरू ठेवावा
चंद्रपूर : वीज वितरण कंपनीने ग्रामीण भागात विशेष लक्ष देऊन वीज पुरवठा सुरुळीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. काही गावात वीज दुरुस्त करण्यासाठी कर्मचारीच नसल्याने अनेकवेळा कित्येक तास ग्राहकांना वाट बघावी लागते. सध्या पावसाचे दिवस असल्याने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून वीज सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.
वाढत्या महागाईने नागरिक त्रस्त
चंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे. महागाई कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पेट्रोल-डिझेलचे भावही सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रवासी भाड्यामध्येही वाढ झाली आहे.
रिक्त पदे भरण्याची मागणी
चंद्रपूर : विविध शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांत अनुकंपा तत्त्वावरील पदे भरण्यात आली नाहीत. त्यामुळे अनुकंपाधारकांना अडचण होत आहे. त्यामुळे ही पदेही भरण्याची मागणी केली जात आहे.
बेरोजगारांमध्ये निराशा
चंद्रपूर : काही वर्षांपासून नोकरभरती झाली नसल्याने बेरोजगारांमध्ये नैराश्य पसरले आहे. त्यातच विविध बँकांकडून सहजासहजी कर्जच मिळत नसल्याने त्यात भर पडत आहे. काही तालुक्यांमध्ये उद्योग नसल्याने युवकांमध्ये निराशा पसरत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
बाबूपेठमधील अनेक भागात अंधार
चंद्रपूर : बाबूपेठ परिसरातील अनेक भागातील पथदिवे बंद राहतात. त्यामुळे या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. येथील नागरिकांनी अनेकदा याबाबत तक्रार केली. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देऊन समस्या सोडवावी, अशी मागणी आहे.
ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गावखेड्यातील रस्त्यांची थातूरमातूर कामे केल्याने दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय, अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
जनावरांना टॅग लावण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेतीवरच उदरनिर्वाह करतात. आता दुधाळ जनावरांचे पालन करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व जनावरांना टॅग लावून नोंदणी करावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.
रोजगाराला चालना द्यावी
चंद्रपूर : जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळावा, यासाठी शासनाने तालुकास्तरावर जागा उपलब्ध करून दिली. मात्र, काही तालुक्यात उद्योगाचा पत्ता नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारांची संख्या वाढत असून स्थानिक युवकांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे.