वरोरा : शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्त्व डॉ. विनायक वामन वझे यांचे शनिवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.
वरोरा शहरातील संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्राचे नावलौकिक असलेले डॉ. वझे हे पंचक्रोशीत अनेक ललित कला संस्थांचे पितृतुल्य आधारवड होते.
त्यांनी शहरात संगीत कलानिकेतन संस्थेची स्थापना केली. अनेक वर्षे पं. भातखंडे आणि पं. पलुस्कर संगीतमहोत्सव त्यांनी हिरिरीने राबविला. प्रसिद्ध संगीतकार शंकर जयकिशन यांचे ते सहाध्यायी होते. पैगाम या सामाजिक आणि साहित्यिक संस्थेच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. क्रिकेट या खेळाची त्यांना आवड होती आणि रणजी ट्रॉफीच्या निवड समितीचे ते सदस्यही होते. त्यांच्या निधनाने सामाजिक, कला आणि वैद्यकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात चार बहिणी, मुलगा अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सागर, स्नुषा स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. मीरा, दोन मुली, जावई, नातवंडे, मित्र आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.