'सुधारित-नागरिकत्व संशोधन कायदा समर्थन म्हणजेच देशप्रेम'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 01:51 AM2019-12-29T01:51:41+5:302019-12-29T01:52:11+5:30
काँग्रेसकडून राज्यभर विरोधात मोर्चे; शिवसेनेची मोर्चाला दांडी
चंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह देशहितासाठी झटत असून त्यांची निती सुध्दा देशहितातच असते. नागरिकत्व संशोधन कायदा हा राष्ट्रहितातच असून देशातील कुठल्याही नागरिकांच्या विरोधात हा कायदा नाही. पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान येथील अत्याचाराला बळी पडून भारतात आलेल्या तेथील अल्पसंख्यांक हिंदु, शिख, ईसाइ, बौध्द यांना साथ देण्यासाठी आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
चंद्रपूर येथे सीएएच्या समर्थनार्थ राष्टÑीय चेतना मंचच्या वतीने आयोजित रॅलीत ते बोलत होते.अहीर पुढे म्हणाले, नागरिकता देण्याचा कायदा आहे. परंतु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये व नुकताच लोकसभा तसेच राज्यसभेत पारित झालेल्या कायद्यानुसार आता पाच वर्षात नागरिकता देण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे. हा कायदा मुस्लीमांविरोधात असल्याबाबत कॉंग्रेस व विरोधी पक्ष संभ्रम पसरवीत असून मुस्लीम समाजाला भडकविण्याचे पाप करीत आहे, देशात अशांती व हिंसा पसरवित असल्याची टीका यावेळी हंसराज अहीर यांनी केली. परंतु त्यांच्या या क्रुर राजकारणामुळे जाळपोळीतून व अन्य हिंसक आंदोलनातून राष्ट्रीय संपत्तीचे अतोनात नुकसान होत आहे.असेही यावेळी हंसराज अहीर यांनी सांगितले.
यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, भारतमातेवर, हिन्दुस्थानवर प्रेम करणाऱ्या कोणाही नागरिकाला या कायद्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. जे याचा विरोध करीत आहेत त्यांची वृत्ती देशविरोधी आहे. या कायद्यामुळे या देशातील कोणत्याही मुस्लीम धर्मीय बांधवाला कोणताही धोका नाही, असे स्पष्ट करत आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, या कायद्याच्या माध्यमातून नागरिकत्व देण्याबाबत संशोधन करण्यात आले आहे. नागरिकत्व काढून घेण्यासंदर्भात कोणतेही कलम यात नाही. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हासंघचालक आमदार शोभा फडणवीस आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. राज्यघटना वाचवण्यासाठी तसेच देशाची एकसंधता कायम ठेवण्यासाठी काँग्रेसच्या वतीने पक्षाच्या वर्धापनदिनी शनिवारी झेंडा मार्च काढण्यात आला.शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी नेतृत्त्व केले.
सोलापुरात शिवसेनेची मोर्चाला दांडी
केंद्रातील भाजपप्रणित सरकारने जनहिताविरोधी लादलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी शनिवारी सोलापुरात महाविकास आघाडीने काढलेल्या मूक मोर्चात शिवसेना सहभागी झाली नाही. या कायद्याला आमचा विरोध नाही व पाठिंबाही नसल्याने मोर्चात सहभागी झालो नसल्याचे स्पष्टीकरण शिवसेना नेत्यांनी दिले आहे.
जमियत उलेमा संघटनेतर्फे धुळे बंद
केंद्र सरकार पारीत केलेला एनआरसी व सीएए कायद्या रद्द करण्याच्या मागणीसाठी जमियत उलेमा संघटनेतर्फे शनिवारी धुळे बंद आणि निदर्शने केली.आंदोलनात विविध राजकीय पक्षासह संघटनांनी सहभाग घेतला.