दुर्गापूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वॉर्डाची कमतरता व खाटांअभावी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना फरशीवर झोपण्याची नामुष्की आली आहे. त्यामुळे या कारभाराप्रति तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. दुर्गापूर ग्रामपंचायतीने दोन ते तीन वर्षाआधी एका अतिरिक्त वॉर्ड इमारतीचे बांधकाम केले आहे. मात्र ही इमारत अद्यापही आरोग्य केंद्राला हस्तांतरीत केलेली नाही. त्यामुळे वॉर्डाची कमतरता आहे. दुर्गापूर ग्रामपंचायतीलगतच प्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्रात दुर्गापूर, ऊर्जानगर व्यतिरिक्त सिनाळा, मसाळा, नवेगाव, वरवट, चोरगाव, भटाळी, किटाळी, पायली, चिचोली, वढोली, कढोली, पद्मापूर, अडेगाव या गावांचा समावेश आहे. या गावातील शेकडो रुग्णांवर येथे उपचार केला जातो. तर विविध शस्त्रक्रियाही पार पडतात. मात्र, आरोग्य केंद्रात महिला व पुरुषांकरिता केवळ दोनच वॉर्ड असून या दोन वॉर्डात १४ खाटांची सोय आहे. त्यामुळे रुग्णांना दाखल करताना मोठी तारांबळ उडते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करुन अतिरिक्त वॉर्डाची मागणी केली. त्यानंतर एक वॉर्ड मंजूर झाले. चार खाटांची सोय असलेल्या एका अतिरिक्त वॉर्डाचे बांधकाम ग्रामपंचायत दुर्गापूरने दोन ते तीन वर्षापूर्वी केले. मात्र सदर इमारत अद्यापही आरोग्य केंद्राला हस्तांतरीत न केल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. याचा परिणाम १ जानेवारीला झालेल्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर दिसून आला. या दिवशी एक पुरुष व १८ महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर पुरुषाला सुट्टी देण्यात आली. तर १४ महिलांना दोन वॉर्डात ठेवण्यात आले. मात्र उर्वरीत चार महिलांना ठेवण्याकरिता वॉर्ड नसल्याने त्यांना सभागृहातच फरशीवर ठेवण्याची नामुष्की रुग्णालयावर ओढावली. चारही महिलांना शस्त्रक्रिया झालेल्या अवस्थेत फरशीवर झोपवून औषधोपचार सुरु आहे. काही महिला समवेत चिमुकलेही आहेत. त्यामुळे त्याची होत असलेली हेळसांड थांबविण्यासाठी बांधकाम केलेला वॉर्ड हस्तांतरीत करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
शस्त्रक्रिया झालेल्या महिलांनाही झोपावे लागते फरशीवर !
By admin | Published: January 10, 2015 1:03 AM