लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कुणाला पोलिस अधिकारी व्हायचे, तर कुणाला पीळदार शरीर कमवायचे आहे. यासाठी आजची तरुणाई जिममध्ये जाऊन तासन् तास घाम गाळताना दिसून येते. सध्या उन्हाळा सुरु असल्याने व्यायाम करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे, अन्यथा जिममध्ये जाऊन घाम गाळणे जिवावरही बेतू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात जिममध्ये जाऊन व्यायाम करताना अतिरेक करू नका, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
हल्ली जागोजागी जिम सुरू झालेले आहेत. त्यासाठी जिम जॉइन करणाऱ्यांना कमी कालावधीत पीळदार आणि आकर्षक शरीरयष्टी कमवण्यासाठी विविध प्रकारची प्रोटीनयुक्त पावडर दिल्या जातात. या प्रोटीनमुळे अगदी कमी कालावधीत डौलदार आणि पीळदार शरीरयष्टी तयार झाल्याचे दिसते. मात्र, जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यापूर्वी योग्य आहार, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होता कामा नये, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
तज्ज्ञांचा सल्ला घ्या उन्हाळ्यात आहार कसा घ्यावा, किती वेळा जेवणे करावे, आहारात काय असले पाहिजे, कोणत्या फळांमुळे आणि पदार्थामुळे शरीरातील कॅलरीज टिकून राहतील, याचा सल्ला तज्ज्ञांकडून घ्यावा.
जिम पूर्वी काय खाल?जिम सुरू करण्यापूर्वी नेमका कोणता आहार घेतला पाहिजे. याचेही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. पौष्टिक प्रोटीन पावडर घेण्याऐवजी पौष्टिक आहार घेतल्यास अधिक फायदा होतो. यामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल.
लठ्ठपणा कमी करण्यासाठीकामाचा व्याप, अवेळी जेवण, झोप आणि व्यायामाचा अभाव असतो. तेव्हा लठ्ठपणा येतो. हा लठ्ठपणा कभी करण्यासाठी जिमध्ये जाऊन व्यायाम करण्याचा आटापिटा केला जातो.
प्रोटीन पावडरचा वापरजिममध्ये जाऊन कभी दिवसांमध्ये पीळदार शरीर कमावण्यासाठी ट्रेनरकडून प्रोटीन पावडर दिले जाते. बाजारात अगदी सहज मागेल त्याला प्रोटीनचे पावडर मिळते, याचा अतिवापरही केला जातो. प्रोटीन पावडरचा अतिवापर शरीरासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सैन्य भरतीचे तरुणांचे टार्गेटमागील वर्षात पोलिस पदासाठी जागा निघाल्या होत्या. यात जीव ओतून कष्ट घेतले. मात्र, यातील काहींचे पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले. काहींनी पुन्हा नव्या दमाने पोलिस भर्तीची तयारी सुरू केली आहे. अनेकांना सैन्यात भर्ती होण्यासाठीही तयारी सुरू केलेली आहे. त्यामुळे अनेक जण जिमध्ये घाम गाळत आहेत.
भोवळ येण्याचा धोकाधावताना कधी-कधी अचानक डोळ्यासमोर अंधारी येते. भोवळ येऊन जमिनीवर कोसळण्याचा धोका असतो. पळताना भोवळ येईपर्यंत धावू नये.
जिममध्ये बारमाही गर्दीकाही वर्षांपूर्वी गाव आणि शहरात व्यायाम करण्यासाठी तालीम किंवा आखाडे असायचे. याच आखाड्यांची जागा आता जिमने घेतली आहे. अत्याधुनिक मशीनच्या साहाय्याने व्यायाम करण्याची ही नवीन पद्धत प्रचलित झाल्याने जिममध्ये नेहमीच गर्दी असते.
"उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक वेळा थकवा जाणवतो. त्यामुळे आरोग्याकडे या दिवसामध्ये विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी रसदार फळांचे सेवन करावे. वेळी-अवेळी जेवण करू नये. उन्हामध्ये बाहेर जाणे टाळावे."- डॉ. सुधीर मत्ते, जनरल फिजिशियन, चंद्रपूर
"जिममध्ये व्यायाम करताना त्यामध्ये सातत्य टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. विशेषतः तासन् तास व्यायाम करणे टाळले पाहिजे. शरीराला झेपेल तेवढाच व्यायाम करावा. जिममध्ये साहित्य हाताळताना योग्य मार्गदर्शन घेणेही आवश्यक आहे."- विशाल हिवरकर, ट्रेनर चंद्रपूर