चंद्रपूर : श्रावण महिन्यामध्ये सण, उत्सव असतात. त्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये या महिन्यामध्ये साखरेची मागणी वाढते. हीच संधी साधत व्यापारी साखरेचे भाव वाढवितात. या वर्षी तर इंधनाचे दर वाढल्यामुळे महागाई वाढली आहे. त्यामुळे साखरेचेही भाव आणखी वाढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सामान्यांचा सणासुदीचा गोडवा काही प्रमाणात कमी होणार आहे.
सण, उत्सवाच्या काळात साखरेला मागणी वाढू लागल्याने साखरेचे दर वाढत आहेत. किरकोळ बाजारात सध्या साखर ३६ रुपये किलोने विकली जात आहे. या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बाॅक्स
का वाढताहेत भाव?
मागील काही दिवसांमध्ये इंधन दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. वाहतूकदारांनी आपले दर वाढविल्यामुळे प्रत्येक वस्तूच्या किमती सध्यस्थितीत वाढल्या आहेत. व्यापारी वाहतुकीचा पैसा काढण्यासाठी भाव वाढवित आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे.
बाॅक्स
सणासुदीच्या तसेच उत्सवांच्या दिवसांमध्ये साधारणत: साखरेची मागणी इतर दिवसांच्या तुलनेमध्ये वाढते. मागील काही दिवसांपासून साखरेच्या किमतीमध्ये वाढ झाली नसली तरी पुढील काही दिवसांवर असलेल्या विविध सण तसेच उत्सवांमुळे साखरेचे भाव वाढतील, असा अंदाज व्यापारी वर्गातून व्यक्त केला जात आहे.
बाॅक्स
महिन्याचे बजेट वाढले
कोरोना संकट आहे. त्यामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. याच परिस्थितीमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सामान्यांचे बजेट कोलमडत आहे. केंद्र तसेच राज्य शासनाने महागाईवर नियंत्रण आणून सामान्यांना दिलासा देणे सध्या तरी गरजेचे आहे.
- वैशाली उमाटे
चंद्रपूर
मागील काही वर्षांमध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यातच पेट्रोल, डिझेलचेही दर झपाट्याने वाढले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांनी जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होतो. निवडणुका आल्या की राज्यकर्ते सामान्यांना केवळ आश्वासने देतात. त्यानंतर मात्र ते विसरतात. महागाईला मात्र सामान्य नागरिकांनाच तोंड द्यावे लागते.
- वर्षा सोयाम, चंद्रपूर