एक कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर
नागभीड : तालुका क्रीडा संकुलांतर्गत खनिज विकास निधीमधून नागभीड येथे स्विमिंग पुलाची निर्मिती होणार आहे. यासाठी एक कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूलाच एक एकर जागेत हे स्विमिंग पूल साकारणार आहे. यात महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळी व्यवस्था राहणार आहे. शौचालय बाथरूमसह कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या या स्विमिंग पूल अंतर्गत असणार आहेत. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या कामाचे नियोजन आहे. शासनाकडून या स्विमिंग पूलसाठी एक कोटी ३५ लाख रुपयांचा निधी प्राप्त होणार असला तरी नगर परिषदही या स्विमिंग पुलासाठी ५० लाख रुपये खर्च करणार असल्याची माहिती नगर परिषदेचे उपाध्यक्ष गणेश तर्वेकर व बांधकाम सभापती सचिन आकुलवार यांनी नगर परिषदेत 'लोकमत'शी बोलताना दिली. या स्विमिंग पुलासाठी आवश्यक असलेल्या विंधन विहिरीचे खोदकाम नुकतेच पार पडले.