चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कर्तव्य बजावत असताना स्वाती धुमने (३८) या महिला वनरक्षकावर माया नामक वाघिणीने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही थरारक घटना शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ताडोबाच्या कोलारा वनपरिक्षेत्रात कोलारा गेटपासून ४ किमी अंतरावरील कक्ष क्रमांक ९७ मध्ये घडली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर पहिल्यांदाच वाघाचा असा हल्ला झाला.
राष्ट्रीय वाघ सर्वेक्षण-२०२२ अंतर्गत कोलारा गेटपासून आत सुमारे ४ किमी अंतरावर वनरक्षक स्वाती धुमने ही तीन वनमजुरांसह वाघांचे चिन्ह सर्वेक्षण (ट्रान्झिट लाइन सर्व्हे) करीत होती. कक्ष क्रमांक ९७ मध्ये सुमारे २०० मीटरवर त्यांना माया वाघीण दिसली. वाघिणीला बघून त्यांनी आपला मार्ग बदलला. मात्र, काही वेळात अचानक वाघिणीने स्वाती धुमने यांच्यावर हल्ला चढवून जंगलात फरफटत नेले.
ही बाब कळताच वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून स्वाती धुमने यांचा शोध घेतला असता, मृतदेहच गवसला. या घटनेनंतर लगेच सर्व्हे थांबविण्यात आला, अशी माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. वनविभागाच्या वतीने पती संदीप सोनकांबळे यांना तातडीची मदत देण्यात आली. स्वाती व संदीप यांना चार वर्षांची आरुषी नावाची मुलगी आहे. स्वातीच्या अचानक जाण्याने आरुषी पोरकी झाली आहे.
...तर अनर्थ टळला असता !
ताडोबातील पाणवठ्यावर वाघाची सूक्ष्म चिन्हे घेण्याचे काम शुक्रवारपासून सुरू झाले. त्यासाठी स्वाती धुमने यांनी दोन एटीएस कर्मचाऱ्यांची मागणी वन अधिकाऱ्यांकडे केली होती. ही मागणी धुडकावून लावली गेली. एटीएसचे प्रशिक्षित कर्मचारी सोबत असते, तर ही घटना घडली नसती. या घटनेला सर्वस्वी वनाधिकारी जबाबदार आहे, असा आरोप वनरक्षक स्वाती धुमने यांचे पती संदीप सोनकांबळे यांनी केला.
स्वाती ठरली ताडोबातील पहिली वन शहीद
स्वाती ही ताडोबातील पहिली वन शहीद ठरली आहे. वडिलांच्या नोकरी दरम्यान आलापल्ली येथे स्थायी झालेली स्वाती ११ वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात वनरक्षक भरतीमध्ये वनरक्षक पदावर रुजू झाली. राजुरा व जिवतीत दहा वर्षे दबंग वनरक्षक म्हणून सेवा केल्यानंतर, मागील डिसेंबरपासून ताडोबातील कोलारा कोअर झोन क्षेत्रात वनरक्षक म्हणून कर्तव्य बजावत होती. शनिवारी सकाळी ६ वाजता घरची कामे उरकून वाघांचे चिन्ह सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याने, पती संदीप सोनकांबळे यांनी तिला कोलारा येथे कर्तव्यावर सोडून दिले. यानंतर, काही वेळातच स्वातीचा दुर्दैवी अंत झाला.