चंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये ताडोबात वाघांची संख्या वाढली आहे. वाघांचे हमखास दर्शन येथे होत असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी उसळते. येणाऱ्या पर्यटकांना विविध सोयी-सुविधा दिल्या जात आहेत. दरम्यान, पर्यटकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी मोहर्ली येथील पर्यटन गेटचे सुशोभीकरण करण्यात येणार असून यासाठी ७.४२ कोटी खर्च केले जाणार आहेत.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जागतिक पातळीवर वाघांसाठी प्रसिद्ध आहे. वाघांसह येथे बिबटे तसेच अन्य वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. त्यामुळे दिवसेंदिवस पर्यटक येथे मोठ्या संख्येने हजेरी लावतात. वाघ हा अभिमानाचा विषय असून वाघाची गती व शक्ती हे पराक्रमाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे वन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सौजन्यपूर्ण आचरणातून ताडोबातील पर्यटकांची मने जिंकावी, अशी अपेक्षा राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यटन गेटच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी व्यक्त केली आहे.
यावेळी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) प्रवीण चव्हाण, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर, राजस्थान वन्यजीव बोर्डाचे सदस्य सुनील मेहता, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, मोहर्लीच्या सरपंच सुनीता कातकर, हरीश शर्मा, डॉ.मंगेश गुलवाडे, संध्या गुरुनुले, छायाचित्रण दिग्दर्शक नल्ला मुथ्थू आदींची उपस्थिती होती.
मोहर्लीत पर्यटन सेवा केंद्र
ताडोबा क्षेत्रातील मोहर्लीत आकर्षक प्रवेशद्वार, पायाभूत सुविधांसोबतच आर्किटेक्टद्वारे भिंती रंगविणे, आकर्षक मूर्ती लावणे, वातानुकूलित प्रतीक्षालय, उपाहारगृह, व्याघ्र प्रकल्पाची सचित्र माहिती देणारे केंद्र, प्रसाधन गृहे, भेटवस्तू विक्री केंद्र, पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे.
ताडोबावर लघुचित्रपट
छायाचित्रण दिग्दर्शक नल्ला मुथ्थू यांनी माया वाघीण व तिच्या बछड्यांवर आधारित शॉर्टफिल्म तयार केली. आता त्यांनी ताडोबावर आधारित आकर्षक फिल्म तयार करावी. ही फिल्म मुंबईच्या चित्रपटनगरीत दाखविण्यात येईल. वाघांची माहिती केंद्रासोबत मोहर्लीत सात डायमेंशनयुक्त थिएटर तयार करावे, अशी सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी केल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ताडोबावर लघुचित्रपट सुद्धा बघता येणार आहे.