चंद्रपूर : कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण काहीअंशी सुरू आहे. या परिस्थितीत शिक्षकांना इंग्रजी विषयाचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात सप्टेंबर महिन्यापासून ऑनलाईन टॅग बैठकांना सुरुवात करण्यात आली आहे.
ही टॅग बैठक दर महिन्याला घेण्यात येते. या बैठकांमध्ये एका केंद्रातील इंग्रजीचे शिक्षक एकत्र येऊन इंग्रजी अध्यापनाच्या क्लुप्त्यांवर चर्चा घडवून आणतात. चंद्रपूर येथे १४० केंद्रांत ही बैठक एकाचवेळी घेण्यात आली. असा प्रयोग करणारा चंद्रपूर जिल्हा राज्यात पहिला आहे.
दाताळा येथील शिक्षक प्रशिक्षणाला शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य धनंजय चाफले, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूरच्या इंग्रजी विषय सहायक कल्पना बन्सोड यांनी भेटी दिल्या.
या बैठकीसाठी सर्व तालुक्यातील इंग्रजी विषय साधन व्यक्ती व टॅग समन्वयक यांनी सहकार्य केले.
बाॅक्स
गुणवत्ता सुधारण्यासाठी
इंग्रजी भाषेच्या विकासासाठी राज्य शासन, टाटा ट्रस्ट, ब्रिटिश कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील इंग्रजी भाषेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मागील तीन वर्षांपासून तेजस प्रकल्प राबविण्यात येत आहे. या संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्रात इंग्रजी भाषा विकासाचे काम मोठे झाले आहे. आपल्या शाळेतील विविध उपक्रम शिक्षक शेअर करतात. अध्यापनात येणाऱ्या समस्यांवर सुद्धा चर्चा करून तोडगा काढला जातो. त्याचप्रमाणे भाषा विकास होण्याच्यादृष्टीने शिक्षकांचा इंग्रजी बोलण्याचा सराव होतो. इंग्रजी अध्यापनात उपयुक्त असणारे लेखांचे वाचन होऊन त्यावर चर्चा केली जाते.