आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : युपीएससी, एमपीएससी परीक्षेमध्ये तोतया उमेदवार व सदोष मुल्यांकनासारखे गैरप्रकार करुन प्रशासनात बोगस अधिकाऱ्यांची भरती केली जात आहे. त्यामुळे भविष्यात प्रशासनाचा दर्जा घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. बोगस निवड व अशा उमेदवारांवर कारवाई करावी, यासाठी ज्ञानज्योती अभ्यासकिचे संचालक प्रा. नामदेव जेंगठे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांना निवेदन देण्यात आले.महाराष्टÑ लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा, पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, कक्ष अधिकारी, कर सहाय्यक अशा विविध प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. मात्र त्या परीक्षांमध्ये आपल्याऐवजी तोतया व्यक्तीला परीक्षेला बसवून उत्तीर्ण केल्याचे प्रमाण वाढले आहे. उमेदवार दलाल व संगणक तज्ज्ञ यांची साखळी चालविणारे सुत्रधार यांना शासन व प्रशासनातील पदस्थाचे पाठबळ असल्याचे निवेदनात नमूद आहे.मागील दहा वर्षांमध्ये झालेल्या परीक्षांची उच्चस्तरीय चौकशी करुन प्रशासनातील दोषी अधिकाºयांवर व कर्मचाºयांवर कार्यवाही करुन नोकरीमुक्त करावे, आयोगाच्या सर्व परीक्षा आॅनलाईन करावे, परीक्षा केंद्रावर उमेदवारांची उपस्थिती बायोमेट्रीक उपकरणाने तपासावी, पदांच्या जाहीरातीपासून सहा महिन्याचे आत पोस्टींग देण्यात यावी, स्पर्धा परीक्षा कोचिंग सेंटर्स शासनाच्या नियंत्रणाखाली आणावे, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.निवेदन देताना प्रा. बालाजी दमकोंडावार, प्रा. राजू आदे, अतुल नंदेश्वर, सचिव जाधव, स्नेहल तोंडरे, विणा ठोणे, पूनम खरकाटे, वैभव कुणावार, अमर रेगुलवार, प्राज्वल साखरकर, पौर्णिमा मेश्राम, शुभम मेश्राम, अमोल मोहुर्ले, शितल उपरकर व अन्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एमपीएससीतील तोतया उमेदवारांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 11:18 PM