सभासदांची मागणी :बोगस मजूर संस्थेच्या नावावर लाखोंचा गैरव्यवहारपोंभूर्णा : देवाडा खुर्द येथील बोगस मजूर संस्थेच्या नावावर लाखो रुपयांची कामे करुन शासनाची व सभासदांची दिशाभूल करण्यात आलेली आहे. यावर यापूर्वीचे ठाणेदारांनी कुठलीच कारवाई न केल्याने संबंधित संस्थेचे मुख्य प्रवर्तक व सचिव अजूनही मोकाट फिरत आहे. या प्रकरणाची नवीन महिला ठाणेदारांनी सखोल चौकशी केल्यास फार मोठे सत्य समोर येणार आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाची योग्य चौकशी करुन यातील दोषी व्यक्तींवर कारवाई होणार काय, असा प्रश्न अन्यायग्रस्त सभासदांकडून केला जात आहे.तालुक्यातील देवाडा खुर्द येथील मजुरांना कुठलीही माहिती न देता त्यांच्या नावाचे खोटे व बनावट दस्ताऐवज तयार करुन सभासदांच्या नावासमोर बोगस छायाचित्राचा वापर करुन बोगस मजूर संस्थेची स्थापना करण्यात आली आणि त्या संस्थेच्या नावावर जवळपास एक कोटी रुपयाची कामे करुन शासनाची व सभासदांची दिशाभूल करण्यात आली. याबाबत अन्यायग्रस्त सभासदांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आणि पोंभूर्णा येथील तत्कालिन ठाणेदार वासमवार यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली. परंतु याला तब्बल तीन ते चार महिन्याचा कालावधी लोटूनसुद्धा वासमवार बोगस मजूर संस्थेच्या मुख्य प्रवर्तक व सचिवावर कोणीच कारवाई केली नाही. त्यामुळे संबंधित व्यक्ती अजूनही मोकाटच फिरत आहेत. आतातरी नवीन महिला ठाणेदारांकडून त्यांच्यावर कारवाई होणार काय, असा प्रश्न अन्यायग्रस्त सभासदांमध्ये निर्माण झाला आहे.पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील बोगस पट्टेधारकांचे लोन संबंध तालुक्यात घोंगावत असतानाच माहितीच्या अधिकारातून पुन्हा दुसरे प्रकरण उघडकीस आले. येथील बोगस पट्टेधारक पुंडलिक कवडू बुरांडे यांनी आपल्या लहान भावाला व भाच्याला हाताशी धरुन चक्क गावातील मृत व्यक्तीच्या व गाव सोडून रोजगारासाठी बाहेरगावी असणाऱ्या आणि गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नावाचा गैरवापर करुन त्यांच्या नावासमोर स्वत:च बोगस स्वाक्षऱ्या केल्या व साईकृपा मजूर सहकारी संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागामधून एक कोटी रुपयांच्या वरील कामे करुन शासनाची व सभासदांची दिशाभूल केली. त्यामुळे अन्यायग्रस्त सभासदांनी पोंभूर्णा पोलीस स्टेशन व संबंधित विभागाकडे तक्रार केली. परंतु अजूनपर्यंत कुठलीच कारवाई न झाल्याने सदर प्रकरणावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अन्यायग्रस्त सभासदांकडून केला जात आहे.पोंभूर्णा पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेल्या महिला ठाणेदारांनी १५ दिवसातच आपले वर्चस्व व अधिकाराचा वापर करुन तालुक्यातील संपूर्ण अवैध दारु विक्रेत्यांना वठनीवर आणले आहे. संबंधित अवैध दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून तालुका परिसरामध्ये शांतता नांदत आहे. त्यामुळे या नवीन महिला ठाणेदार निर्मला किन्नाके देवाडा खुर्द येथील बोगस साईकृपा मजूर संस्थेच्या मुख्य प्रवर्तकावर व सचिवार काय कारवाई करतात, याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)
मुख्य प्रवर्तक व सचिवावर कारवाई करा
By admin | Published: May 28, 2016 1:09 AM