पास योजनेच्या सवलतीमध्ये वाढ करावी
चंद्रपूर : बसमधून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशिष्ट प्रकारची सवलत दिली जाते. शाळकरी विद्यार्थ्यांना अशी सवलत आहे. परंतु, शहरालगत अनेक गावातील नागरिक बसने नियमित प्रवास करतात. मात्र त्यांना अत्यंत तोकडी सवलत देण्यात येते. या सवलतीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
रेतीघाट परिसरातील खंदक गायब
चंद्रपूर : रेतीघाटावरील तस्करी रोखण्यासाठी महसूल विभागाने रेतीघाटाशेजारी मोठमोठे खंदक तयार केले होते. मात्र रेतीचे अवैध खनन करणाऱ्या ट्रॅक्टरचालकांनी ते खंदक माती टाकून बुजवून पुन्हा रेतीची अवैध वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडत आहे.
सावलीतील पाणीपुरवठा बंद
सावली : येथे जलप्रादेशिक योजनेंतर्गत होणारा पाणीपुरवठा मागील दोन महिन्यापासून बंद आहे. याकडे नगरपंचायतचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी हिवाळ्यातच नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबाबत संबंधित विभागाला विचारणा केली असता, रस्त्याच्या बांधकामामुळे पाईपलाईन लिकेज असल्याची बतावणी करण्यात येते.
वाढत्या महागाईने नागरिक त्रस्त
चंद्रपूर : दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाचे आर्थिक गणित विस्कटले आहे. तेल, पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी गृहिणींना आपले बजेट बसवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
बसस्थानकावर पार्किंगची व्यवस्था करावी
चंद्रपूर : येथील बसस्थानकावर पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहनचालक जेथे जागा मिळेल तेथे दुचाकी वाहन ठेवत असल्याने बस काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. चंद्रपूर बसस्थानकावर दुचाकी, चारचाकी घेऊन अनेक जण आपल्या आप्तेष्टांना घेण्यासाठी जात असतात. मात्र पार्किंगची व्यवस्था नसल्याने मोठी अडचण जाते.