लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणखी काही महिने राहण्याची शक्यता ही लढाई दीर्घकाळ लढायची आहे. या विषाणूवर अद्याप लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष काढा सेवन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. केंद्रीय आयुष मंत्रालय व राज्य आयुष विभागाने सुचविलेल्या आयुष चिकित्सा पद्धतीची राज्यात सर्वप्रथम अंमलबजावणी करताना ते बोलत होते.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली डिस्ट्रिक्ट टॉस्क फोर्सची स्थापना झाली आहे. यामध्ये सहअध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कडिर्ले, सदस्य सचिव जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन राऊत तर तज्ज्ञ सदस्य म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, डॉ.राजीव धानोरकर, डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश माद्यासवार, होमिओपॅथी कॉलेजचे प्राचार्य डॉ.गौरकार आदींचा समावेश आहे. समितीच्या निर्णयानुसार फ्रन्ट लाईनवर्कर व संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्ती जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम ३० होमिओपॅथी औषध वाटप करण्यात आले. वांढरी येथील विमलादेवी आयुर्वेद महाविद्यालयातील रसशाळेत आयुष काढा तयार करण्यात आला.
असा तयार करा आयुष काढाआयुर्वेद चिकित्सा पद्धतीनुसार घरी किंवा परिसरात उपलब्ध द्र्रव्यांचा वापर करून आयुष काढा तयार करता येतो. एका व्यक्तिसाठी तुळशीची पाने चार भाग, चार भाग म्हणजे ७-८ पाने, सुंठ दोन भाग, म्हणजे १ इंच तुकडा, काळी मीरी एक भाग म्हणजे २-३ मीरीचे भरड १०० मिली घेवून पाण्यात चहासारखे उकळवावे. चवीसाठी गुळ घालावा व गाळून प्यावे. या काढ्यात लिंबाच्या रसाचे थेंब, अर्धा चमचा हळद, कलमी (दालचिनी) १ इंच तुकडा टाकल्यास फायदेशीर आहे. गुळवेल उपलब्ध असल्यास तिच्या खोडाचा बोटभर लांबीचा तुकडा कांडून काढ्यात टाकावा, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली डिस्ट्रिक्ट टॉस्क फोर्सने दिली.