चंद्रपूर : चटपटीत असलेली पाणीपुरी आबालवृद्धांपासून सर्वांनाच आवडीचा पदार्थ. शहरापासून तर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात नागरिक आवडीने खातात. अस्वच्छतेच्या वातावरणातही खपय्ये पाणीपुरीवर ताव मारतात. मात्र ही पाणीपुरी खाणे अनेकवेळा धोक्याचेही होत आहे. त्यामुळे स्वच्छ आणि निटनेटका असलेल्याच विक्रेत्याकडे पाणी पुरी खा, नाही तर जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेजारी असलेल्या भंडारा येथे काही दिवसापूर्वी पाणीपुरी खाल्यामुळे अनेकांना विषबाधा झाली तर एकाचा जीव गेला. त्यामुळे वेळीच सावध व्हा, पाणीपुरी खा, मात्र स्वच्छतेच्या वातावरणात.
पाणी पुरी हा शब्द उच्चारला तरी अनेकांच्या जिभेला पाणी सुटते. अनेक जण सहपरिवार पाणीपुराचा आस्वाद घेतात. शहरातील विविध चौकांमध्ये सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाणीपुरी खाण्यासाठी गर्दी होते. अनेकवेळा ग्राहक स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत विचारणा करीत नाही. हातात प्लेट घेतली की, डोळे मिटून गुपचूप खाणे सुरु करतात. विक्रेते हातात पुरी घेऊन मटक्यातील पाण्यात थेट बुडवून ग्राहकांच्या प्लेटमध्ये टाकतो. अनेक जण हातात हॅडग्लोजचा वापर करताना दिसत नाही. त्याच हाताने इतर कामे करताना आलेल्या ग्राहकाला पाणी पुरी दिली जाते.
बाॅक्स
अशी घ्या दक्षता
विक्रेत्याला हॅडग्लोज घालून पाणी पुरी देण्यासाठी सांगा
प्लेट नीट स्वच्छ केलेली असावी
एकच प्लेट अनेकांना दिली जाते. मात्र ती स्वच्छ पाण्याने धुतली जात नाही. अशावेळी प्लेटला धुण्यासाठी सांगा.
अस्वच्छ वातावरण असेल तर पाणीपुरी खाणे टाळा
गुणवत्तेसंदर्भात विचारणा करा
बाॅक्स
अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
शहरातील विविध चौकांमध्ये पाणीपुरी विक्रेते सांयकाळच्या वेळी स्टाॅल लावतात. या स्टाॅलवर गर्दी सुद्धा होते. मात्र अन्न औषध प्रशासन विभाग या स्टाॅलकडे साधे फिरकूनही बघत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही वेळा मोठ्या हाॅटेलवर धाड टाकली जाते. मात्र, शहरातील गल्लोगत्तीलीच स्टालचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.