सावरगाव : नागभीड तालुक्यातील वाढोणा परिसरातील वाढोणा, आकापूर, खरकाडा, आलेवाही आदी गावांतील जंगलयुक्त शेती भागात पट्टेदार वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. आकापूर,वाढोणा येथील दोन गुराख्यांना वाघाने ठार केले आहे. त्यामुळे या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी वाढोणा येथील हमारा गाव, राजकीय पक्ष विरहित संघटनेने वनविभागाला निवेदनातून केली आहे. वाढोणा परिसरातील वाढोणा, आकापूर, खरकाडा, आलेवाही, जीवनापूर आदी जंगल प्रभावित गावांत रोवणीचा हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत वाढोणा, आकापूर येथील गुराख्यांना वाघाने ठार केले, तर खरकाडा येथील गुराखी व वाढोणा येथील एका तरुणाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या अनेक शेळ्या, मेंढ्या फस्त केल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. लोकांनी वनक्षेत्रात अतिक्रमण करून चराई क्षेत्र नष्ट केले आहे. मात्र वनविभाग गप्प असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी हमारा गाव संघटनेनी केली असून, वनपरिक्षेत्र अधिकारी अधिकारी, वनविभाग तळोधी यांच्यामार्फतीने उपविभागीय वनसंरक्षण अधिकारी, वन विभाग ब्रह्मपुरी यांना निवेदन देण्यात आले आहे. बंदोबस्त न केल्यास आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे. शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष रुपेश डोर्लीकर, मल्लाजी कन्नावार, संजय गहाणे, बिराजी कोमावार, प्रमोद ठाकूर, विनोद आंबोरकर, खुशाल वाढई, आकाश पालकर, समीर सूर्यवंशी, सचिन कामडी, बाबाजी भीमनवार,बंडू निकोडे, अरुण देवतळे, अक्षय बनवाडे यांची उपस्थिती होती.
वाढोणा-आलेवाही बिटातील नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:33 AM