अनियंत्रित वाहनांवर आळा घाला
चंद्रपूर : येथील पडोली परिसरात कोळसा, राख, रेती व अन्य साहित्याची वाहतूक करणारे अनेक ट्रक ये-जा करतात. मात्र या ट्रकचे चालक भरधाव वेगाने ट्रक चालवत असून रस्त्याच्या वळणावरही वाहनाचा वेग कमी करत नाहीत़ त्यामुळे अपघात होत आहेत.
स्वच्छता अभियानाचे तीनतेरा
कोरपना : केंद्र शासनाकडून देशभर स्वच्छता अभियान राबविला जात आहे. मात्र या अभियानाचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र कोरपना तालुक्यात दिसून येत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागासह तालुका मुख्यालयी सर्वत्र कचरा दिसून येतो. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.
विंजासन-देऊळगाव रस्त्यावर झुडपे
माजरी : विंजासन-देऊळगाव या रस्त्यावर झुडपे वाढली आहेत. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. मात्र झुडपे तोडण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा परिणाम समोरून येणारे वाहने दिसत नाही आणि अपघात घडतात. याकडे लक्ष देऊन झुडपे तोडण्याची मागणी होत आहे.
प्रवाशी वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता
जिवती : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक सुरू आहे. आंध्रप्रदेशाच्या सीमेवर तालुका असल्याने येथे आंध्रप्रदेशातील अनेक वाहने अवैध प्रवासी वाहतूक करीत आहेत. जिवती ते अदिलाबाद या मार्गावर महामंडळाच्या बसेस नसल्याने अवैध वाहतूकदारांचे फावत आहे. ही वाहतूक तातडीने बंद करावी, अशी मागणी आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त
नागभीड : ब्रह्मपुरीकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांचा अंदाज घेता येत नसल्याने अनेकांना अपघात होऊन जखमीही व्हावे लागले आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वीज वितरणचे जनित्र बनले धोकादायक
जिवती : सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने ग्राहकांना शॉक देणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे जिवतीसह अनेक गावात डीपी रात्रंदिवस सतत उघड्या राहतात. या शिवाय विविध विभागात घराजवळून जाणाऱ्या तारांमुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देण्यासाठी वीज वितरण कंपनीकडे वेळ नसल्याचे चित्र तालुक्यात आहे.
रस्त्यावरील बांधकाम साहित्याने अपघात वाढ
चंद्रपूर : शहरात अनेक ठिकाणी घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर लागणारे साहित्य रस्त्यावरच टाकण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नियमानुसार, असे साहित्य रस्त्यावर टाकता येत नाही, मात्र याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे.