चंद्रपूर : खरीप हंगामात कापूस, सोयाबीन व भात लागवडीचे क्षेत्र मोठे असते. मात्र १५ पैकी चार तालुक्यात अजुनही सिंचनाच्या सुविधा वाढल्या नाही. त्यामुळे रब्बीतील लागवड क्षेत्र अन्य तालुक्यांच्या तुलनेत अल्प असते. सध्या धानाचे चुरणे अंतिम टप्प्यात आहेत. कपाशीची काढणी सुरू आहे. या आठवड्यात अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. सध्याची स्थिती पाहून कृषी विभागानेही या दोन पिकांना जपण्याचा सल्ला दिला आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामात धान, हरभरा व अन्य डाळवगीर्य पिके घेतली जातात. यंदा गव्हाचे लागवड क्षेत्र ८ हजार ४२४ हेक्टर पर्यंत पोहोचले.. मागील हंगामाच्या तुलनेत लागवड क्षेत्र वाढले आहे. शासनाकडून यावेळी हरभरा बियाण्यांचा नि:शुल्क पुरवठा करण्यात आला. महाबिजनेही यंदा पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून दिले. त्यामुळे सिंचनाची अल्प सुविधा असणारे शेतकरीही या बियाण्यांचा लाभ घेऊन लागवड करू शकले. परिणामी, हरभ-याचे लागवड क्षेत्र ३५ हजार १९० हेक्टर झाले आहे. रब्बी हंगामात वाढलेला हरभरा पेरा नोंद लक्षणीयच आहे. परंतु, या आठवड्यात अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कायार्लयाने शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी पथक तयार केले आहेत.
हरभरा लागवड करणारे शेतकरी चिंतातूर
हरभरा लागवड करणारे शेतकरी या हंगामात वाढले आहेत. आता हरभरा पिकाला शेंगा लागल्या. सध्या तरी कोणत्याही किडरोगाची लागण झाली नाही. शेंगा अद्याप परिपक्व झाल्या नाही. अशा स्थितीत अकाली पाऊस पडल्यास नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत.
पाणी व खताच्या मात्रेकडे दुर्लक्ष नको
ढगाळ वातावरणामुळे कीडरोग उद्भवण्याचा धोका आहे. अशावेळी शेतक-यांनी पिकांना अतिरिक्त पाणी देऊ नये. शिवाय, काेणत्याही खतांची मात्रा देताना कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मात्र, चुकीची कीडनाशके वापरू नये. कृषी विभागाला माहिती देऊन मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.