फोटो
भद्रावती : तालुक्यात सद्य:स्थितीत शेतीत हरभरा, कापूस, गहू आणि ज्वारी असून सोयाबीन आणि धान निघाले आहे. पानवडाळा येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी मुगाची लागवड करण्याचा विचार केला आहे. या पिकाच्या संवर्धनासाठी येथील शेतकऱ्यांनी कमालीची कंबर कसली आहे. परिसरातील गावांमधील मोकाट जनावरांचा प्रतिबंध करण्यासाठी तहसीलदार महेश शितोळे यांना सरपंच प्रदीप महाकुलकर यांच्या नेतृत्वात ९८ शेतकऱ्यांच्या सहीनिशी निवेदन दिले आहे.
तालुक्यात यावर्षीच्या शेतीच्या हंगामात झालेला नैसर्गिक प्रकोप, पावसाची अनियमितता, बोगस बियाणे, सततची नापिकी, पिकांवरील विविध रोग, कृषी उत्पादनाला हमीभावाची कमी आणि जंगली जनावर यांनी केलेले उभ्या पिकाचे नुकसान, या सर्व बाबींमुळे अपेक्षेपेक्षा फारच कमी कृषी उत्पादन शेतकरीवर्गाच्या पदरात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पानवडाळा गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उन्हाळी मुगाची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच शेतकऱ्यांनी या पिकांच्या मशागती व संवर्धनासाठी प्रयत्न सुरू केले आहे. परंतु, या परिसरातील टाकळी, बेलोरा, नंदोरी, भटाळी, डोंगरगाव, धानोली, जेना, कांसा येथील मोकाट जनावरे पानवडाळा शेतशिवारात शिरून उभ्या पिकाचे नुकसान करतील, अशी भीती येथील शेतकरी व्यक्त करीत आहे. परिसरातील गावापासून येणाऱ्या मोकाट जनावरांपासून शेतशिवारातील उन्हाळी मुगाचे नुकसान होणार नाही, या दृष्टीने सहकार्य करून प्रशासनाने पावले उचलावी, अशी मागणी सरपंच प्रदीप महाकुलकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. पानवडाळा परिसरातील उपरोक्त प्रत्येक गावातील पोलीस पाटील यांच्या मार्गदर्शनात कोतवालामार्फत या संबंधाने दवंडी द्यावी. कोणत्याही पशुपालकांनी आपापली जनावरे मोकाट सोडू नये, जेणेकरून पानवडाळा शिवारात शिरून तेथील शेतकऱ्यांच्या उन्हाळी मुगाचे नुकसान करणार नाही.