मिताली सेठी : आढावा सभेत दिल्या सूचना
चिमूर : चिमूर पंचायत समितीच्या नवीन इमारतीमधील सभागृहास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह असे नाव देण्याचे उपसभापती रोशन ढोक यांच्या प्रस्तावास २० जुलैच्या मासिक सभेने एकमताने मंजुरी देऊन ठराव संमत केला. २८ जुलैला पंचायत समितीस्तरीय आढावा बैठकीकरिता आलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले व मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मिताली सेठी यांनी डेंग्यूच्या प्रकोपावर तत्काळ प्रतिबंध करण्याच्या सूचना अधिकारी, कर्मचारी यांना दिल्या.
चिमूर पंचायत समितीस्तरावरील विविध विभागाची आढावा बैठक पंचायत समिती चिमूर येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. डॉ. सेठी यांनी सर्व विभागप्रमुखांना विविध योजना अंतर्गत अखर्चित असलेला निधी त्वरित खर्च करावा, डासांचा प्रकोप तथा डेंग्यूवर नियंत्रणाकरिता युद्धपातळीवर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जि. प. उपाध्यक्षा रेखा कारेकार, समाज कल्याण सभापती नागराज गेडाम, सभापती राजू गायकवाड, कृषी सभापती सुनील उरकुडे, पंचायत समिती सभापती लता पिसे आदी उपस्थित होते.