पुरातत्त्व विभाग करणार कायापालट : सौंदर्यीकरणासह अनेक कामे प्रगतिपथावर जिवती : निसर्गाची देण असलेल्या व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या माणिकगड किल्ल्याकडे आता पुरातत्व विभागाने विशेष लक्ष देऊन येथील इतिहासाची साक्ष देणाऱ्या पुरातन वास्तुची देखभाल दुरुस्ती व सौंदर्यीकरणाची कामे झपाट्याने सुरू केली आहे. पर्यटक व भाविकांसाठी मानिकगड किल्ला मनमोहक व रमनीय स्थळ म्हणून सज्ज होऊ लागला आहे.गडचांदूर जिवती मार्गावर हेमाडपंथी विष्णूचे मंदिर व ऐतिहासीक किल्ला आहे. वनस्पतीने नटलेल्या या किल्ल्यावर विष्णू मंदिराच्या दर्शनासाठी व किल्ल्याचा आनंद घेण्यासाठी भाविक व पर्यटकांची वर्दळ वाढत चालली आहे. येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी असलेला प्रवेशद्वार पुरातन विभागाच्या देखरेखीखाली आकर्षक बनविण्यात आला आहे. प्रवेशद्वारासमोरील परिसर व पाताळ विहिरीकडे असलेले निजाम गोंदी गेट सुशोभित असे बनविले आहे. विशेष म्हणजे, या कामामध्ये सिमेंटचा कसलाही वापर केलेला नाही. संपूर्ण कामे चुन्याने केली जात आहे. किल्ल्यात प्रगतीपथावर असलेली कामे आणि पावसाची दमदार सुरुवात यामुळे पहाडावरील वनसंपदाही मनमोहक दृश्यात भर टाकत आहे. जिवती तालुका म्हटला की डोंगर दऱ्यांनी वेढलेला सर्वत्र निसर्गाची हिरवळ. याच निसर्गरम्य ठिकाणी पहाडावरील गावे वसली आहेत. निसर्गाची अद्भूत नवलाई या ठिकाणी पाहायला मिळते. उन्हाळा असो किंवा पावसाळा, थंडगार व हवेशीर वातावरण पर्यटक व भाविकांना सुखाहून जाते. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून या माणिकगड किल्ल्यावर भाविक व पर्यटकांच्या संखेत वाढ होताना दिसत आहे. माणिकगड किल्ल्यावरील वनक्षेत्राचा काही भाग डोंगराळ व तीव्र उताराचा असून या भागात, सागवान, धावडा, बेहडा, हिरश, सिताफळ, मोह आदी झाडाबरोबरच मौल्यवान वनस्पतीची झाडे आहेत. त्याचप्रमाणे हरीण, निलगाय, रानडुक्कर, अस्वल, वाघ, ससा, आदी वन्यप्राणी व पक्षीही मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीबरोबरच संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी रस्ते सुरळीत झाले तर येणाऱ्या पर्यटकांना फिरण्यास सोयीचे होईल, त्याचप्रमाणे या किल्ल्यात घोडपांग, पाताळ विहीर असे अनेक विकासात्मक कामे करण्याचे ठिकाण आहेत. संपूर्ण परिसरात विकास केल्यास या परिसरात पर्यटकांची संख्या वाढेल. (तालुका प्रतिनिधी)माणिकगड किल्ल्यावर सौंदर्यीकरण वाढवा!निसर्गरम्य माणिकगड किल्ल्यावर विष्णूचे मंदिर व पुरातन किल्ला असल्याने दिवसेंदिवस भाविक व पर्यटकांची गर्दी वाढत असून येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना मनमोहक करण्यासाठी व खेळण्यासाठी सौंदर्यीकरण व खेळाचे साहित्य, राहण्याची सोय, वीज, पाणी, आदी व्यवस्था वनविभागाने या ठिकाणी केल्यास नक्कीच या पर्यटन स्थळाचा विकास होईल व पर्यटक व भाविकांना सोई-सुविधा मिळेल.
माणिकगड किल्ला पर्यटकांच्या दृष्टीने कात टाकतोयं
By admin | Published: July 23, 2015 12:57 AM