लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपुरात सूर्याचा पारा ४५ अंशावर गेला असतानाच महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे उन्हाचे चटके सोसत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अनेक भागात पाणी पुरवठा चार-चार दिवस ठप्प राहते. त्यामुळे पाणी पुरवठ्याबाबत नागरिक कमालीचे संतापले आहेत. हा संताप आज रस्त्यावर निघाला. संतप्त झालेल्या बालाजी वॉर्ड, विठ्ठल मंदिर प्रभागातील नागरिकांनी रस्त्यावरील लोकांना भीक मागून जमा झालेले पैसे मनपा प्रशासनाला दिले. यावेळी महिला, पुरुष मोर्चाच्या स्वरुपात महापालिकेवर धडकले. मनपा उपायुक्तांना देत ‘पैसे घ्या, पण पाणी द्या’ असा टाहो फोडला.स्वच्छ चंद्रपूर, सुंदर चंद्रपूरचे स्वप्न दाखविणाऱ्या चंद्रपूर महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारामूळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. दरम्यान, आज शनिवारी येथील बालाजी वॉर्ड, विठ्ठल मंदिर वॉर्डातील नागरिकांनी यंदा चांदा ब्रिगेडचे संस्थापक किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा काढला. यादरम्यान महिला, पुरुषांनी रस्त्यावर भिक मागितले. भिक मागून जमा झालेले पैसे उपायुक्त गजानन बोकडे यांना देवून महापालिकेकडे पैसे नसेल तर पैसे घ्या, पण आम्हाला पाणी द्या, अशी मागणी केली.यावेळी जितेंद्र चोरडिया, अतुल रेशिमवाले, दिलीप पाठक, भारत बडवे, राहुल पाल, राजू ठाकरे, ज्योती जुमडे, करूणा जुमडे, शिल्पा बडवे, ज्योती पाठक, विशाल पाठक, किशोर जोशी, संतोष जोशी, संजू जोशी, मनोहर पाठक, ताराबाई जोशी, सागर पावडे, राजू कोहळे, गजानन कोहळे, गौरी ठाकरे, शिला पाल, वर्षा कावडकर, प्राजक्ता हस्तक, सुरेश राजूरकर व नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.हा चंद्रपूरकरांवर अन्यायचसध्या चंद्रपुरात पाण्यासाठी पायपीट सुरु आहे. शहरातील अनेक प्रभागात मागील १० दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांना तप्त उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. इरई धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असूनही शहरात पाणी पुरवठा नियमित केला जात नसल्याने नागरिक संतापले आहे. नियमित पाणी कर अदा करुनही पाणी न मिळणे, हे दुर्दैव असून हा चंद्रपूरकरांवर अन्याय आहे. - किशोर जोरगेवार, यंग चांदा ब्रिगेडयावेळी किशोर जोरगेवार व नगरसेवक विशाल निंबाळकर यांनी मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी कामधंदे सोडून कशी भटकंती करावी लागत आहे, हे सांगितले. त्यानंतर उपायुक्त गजानन बोकडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. सहा दिवसात शहरातील पाणी प्रश्न सुटेल, असे आश्वासन यावेळी मनपा उपायुक्तांनी दिले. आश्वासनाची पूर्तता न झाल्यास तिव्र आंदोलन करु, असा इशारा यावेळी यंग चांदा ब्रिगेटने दिला.काही दिवसांपूर्वी चंद्रपूर शहरातील बालाजी वॉर्ड परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्त संजय काकडे व पाणी पुरवठा कंत्राटदार यांची भेट घेऊन त्यांना समस्या सांगितली. यावेळी ही समस्या निकाली काढण्याचे आश्वासन मनपा आयुक्त यांनी दिले. पण आठ दिवस लोटूनही बालाजी वॉर्डातील नागरिकांची पाण्याची समस्या जैसे थे आहे. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी शनिवारी महापालिकेवर धडक दिली. वॉर्डातील मुख्य पाईप लाईन नवीन टाकावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
भीक मागून मनपाला रक्कम पैसे घ्या; पण पाणी द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:19 AM
चंद्रपुरात सूर्याचा पारा ४५ अंशावर गेला असतानाच महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे उन्हाचे चटके सोसत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अनेक भागात पाणी पुरवठा चार-चार दिवस ठप्प राहते. त्यामुळे पाणी पुरवठ्याबाबत नागरिक कमालीचे संतापले आहेत.
ठळक मुद्देनागरिकांची मागणी । पाण्यासाठी चंद्रपूरकरांचा महापालिकेवर मोर्चा