‘पावसाळ्यात जनावरांची घ्यावयाची काळजी’ या विषयावर ‘लोकमत’ने त्यांच्याशी विशेष बातचीत केली. यावेळी डॉ. गभणे म्हणाले, पावसाळ्यात दूषित पाणी, डास, हवेतील आर्द्रता यामुळे जनावरांमधील रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. या बाबींमुळे जिवाणूजन्य, विषाणूजन्य व कीटकजन्य आजार पसरतात. परिणामी जनावरांना घटसर्प, एकटांग्या, आंत्रविषार, तिवा यासारखे विविध आजार उद्भवतात. घटसर्प हा अतिशय घातक व जीवघेणा आजार प्रामुख्याने म्हशींमध्ये आढळतो. एकटांग्या हा आजार प्रामुख्याने एक ते दीड वर्ष वयोगटातील वासरांमध्ये आढळतो, तर आंत्रविषार हा आजार शेळ्या व मेंढ्यांमध्ये आढळतो.
पावसाळ्यापूर्वी, तसेच पावसाळ्यात जनावरांना जंत निर्मूलन करून घेणे आवश्यक आहे. जंतनाशक औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपलब्ध आहेत. जनावरांच्या शरीरावरील जंतांचे प्रमाण कमी झाल्याने रक्ताचे प्रमाण वाढून शरीरावरील ताण कमी होतो व जनावरे आजारांना बळी पडण्याचे प्रमाण कमी होते, असे गिरीश गभणे यांनी सांगितले.
यासोबतच पशुपालकांनी जनावरांना रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. म्हशींना घटसर्पाची, एक दीड वर्षाच्या गायी, म्हशीच्या वासरांना एकटांग्याची व शेळ्या-मेंढ्यांना आंत्रविषाराची लस टोचून घ्यावी. या सर्व लसी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय जनावरांना स्वच्छ पाणी पाजावे. गोठ्याची स्वच्छता ठेवावी, गोठ्याच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नये, बुरशी लागलेली व काळपट तण खायला घालू नये, अधिक डास असल्यास गोठ्यात पंखा लावावा. पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने गावागावात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरांमध्ये पशुपालकांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही डाॅ. गभणे यांनी यावेळी केले.