ब्रह्मपुरी : तालुक्यातील दक्षिण भागातील तळाेधी-गांगलवाडी-व्याहाड या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्ता उखळला आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी कृती संसाधन समितीच्या शिष्टमंडळांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
तळोधी-गांगलवाडी-व्याहाड या रस्त्यावरुन जड वाहनाने रेतीची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जाते. त्यामुळे हा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, वाघग्रस्त कुटुंबातील एका सदस्याला वनविभागात कायमस्वरूपी नोकरी द्यावी, गावाशेजारील जंगलाला भींत बांधावी, वाघ संरक्षण अधिनियमात संशोधन करावे, पाळीव प्राण्याच्या हल्ल्यात मरण पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना मदत द्यावी, अतिक्रमित शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे द्यावे, ७/१२ वरील बेदखल नाेंद रद्द करावी, नवीन आवळगाव तालुका निर्माण करावा, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार देण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात कृती संसाधन समितीचे यशवंत खोब्रागडे, भीमराव बनकर, उमेश बागडे, माेतीलाल देशमुख, प्रमोद रामटेके, नंदकिशोर धकाते, वनिता भैसारे, अनिल उंदिरवाडे, पुरुषोत्तम मेश्राम, शुभम चाैधरी, गोकुळ जेंगठे, बाजीराव मलाेडे, हाेमराज इनकने, अरुण सहारे, मदन रामटेके उपस्थित होते.