आशिष खाडे
पळसगाव : कोणतेही गाव म्हटले की, गावात तलाठी कार्यालय हे असतेच. प्रत्येक गावात सजाकरिता स्थायी इमारत आहे. तलाठी कार्यालयात शेतीसंबंधित कागदपत्रे जसे सात बारा, आठ- अ, नकाशा, उत्पनाचा दाखला, गावाची शिव, शेतातील नकाशा व इतर कागदपत्रांसाठी गावात तलाठी कार्यालय असते; परंतु बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथे तलाठी कार्यालय असून, अजूनही ते इमारतीच्या प्रतीक्षेतच आहे.
स्थायी इमारतीअभावी या कार्यालयाची गावात इकडून तिकडे, तिकडून इकडे, अशी भटकंती सुरू आहे. भाडेतत्त्वावर किरायाच्या छोट्या खोलीमध्ये तलाठी कार्यालयाचा कारभार सुरू आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाकरिता अडथळा निर्माण होत आहे. पळसगाव येथील तलाठी कार्यालय हे फक्त पळसगाव या एका गावापुरते मर्यादित नसून या एका सजावर पळसगाव, किन्ही, कवडजई, इटोली, मानोरा, आसेगाव, गिलबिली, भडकाम ही गावेदेखील अवलंबून आहेत. या गावांतील गावकऱ्यांनाही शेतीसंबंधी पूर्ण दस्तऐवज याच कार्यालयात मिळतात. त्यामुळे बाहेरगावांहून येणाऱ्या शेतकऱ्याला या बाबीचा नाहक त्रास होतो, तसेच एवढ्या गावाची कागदपत्रे असलेले कार्यालय इमारतीअभावी भटकंती करीत आहे. त्यामुळे या सजाकरिता एक सुसज्ज इमारत असावी. जेणेकरून एक स्थायी व कायमस्वरूपी ठिकाण प्राप्त होईल. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तलाठी कार्यालयासाठी नवी इमारत बांधावी, अशी मागणी संबंधित शेतकरी व नागरिकांची आहे.