परिमल डोहणे
चंद्रपूर : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये महिला शेतकऱ्यांना सहभागी होताना कंपनी निबंधकाकडून शेतकरी असल्याचा दाखला घ्यावा लागत होता. या दाखल्यांसाठी महिलांना मोठी धावपळ करावी लागत होती. त्यामुळे राज्याच्या कृषी आयुक्तांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना शेतकरी महिलांना ‘शेतकरी असल्याचा दाखला’ देण्यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे शेतकरी महिलांची धावपळ थांबणार आहे.
शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यावर केंद्र व राज्य शासनाचा भर आहे. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये भागधारक म्हणून सहभागी होण्यासाठी कंपनी निबंधकाकडून (आरओसी) शेतकरी असल्याबाबतचा दाखला मागितला जातो; मात्र शेतकरी कुटुंबातील ज्यांच्या नावे शेती नाही, अशा महिला अथवा अन्य सदस्यांना शेतकरी म्हणून दाखला मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या. महिलांची धावपळ अधिक होत होती. त्यामुळे कृषी आयुक्तांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ‘शेतकरी असल्याचा दाखला’ देण्याचे परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे शेतकरी महिलांची धावपळ थांबणार आहे.
केवळ कंपनी भागधारक होण्यासाठीच लागू असणारा दाखला
तालुका कृषी अधिकाऱ्यांनी महिला शेतकऱ्यांना दिला जाणारा ‘शेतकरी असल्याचा दाखला’ हा केवळ शेतकरी उत्पादक कंपनीचा भागधारक म्हणून कंपनी सहभागी होण्यासाठी राहणार आहे. इतर कामासाठी हा दाखला लागू होणार नाही. कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीच्या नावे शेती असल्यास त्या कुटुंबातील कोणत्याही अन्य सदस्याला ‘शेतकरी असल्याचा दाखला’ द्यावा, असे परिपत्रकात नमूद केले आहे.
राज्यात केवळ १५.४६ टक्के महिला शेतकरी
राज्यात महिलांच्या नावे जमिनीचा सात बारा असलेल्या महिला शेतकऱ्यांची संख्या सुमारे १५.४६ टक्के आहे. तर राज्यात ७९.५२ टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक असल्याचे परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.