नागभीड : नागभीडला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या तपाळ पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे. परिणामी येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
शासकीय दूध शीतकरण केंद्राजवळ शुक्रवारी संध्याकाळी ही पाईपलाईन फुटल्याची माहिती आहे. प्रशासनाने हा बिघाड त्वरित दूर करावा, अशी मागणी आहे.
आता उन्हाळा सुरू झाला आहे. सूर्य आग ओकत असल्याने प्रत्येकाची पाण्याची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत तपाळ पाणी पुरवठा योजनेची मुख्य पाईपलाईन फुटल्याने ही योजना बंद आहे. उल्लेखनीय बाब ही की नागभीड येथील बहुतेक नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी तपाळ पाणीपुरवठा योजनेवरच अवलंबून आहेत. परिणामी नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी जे काही साहित्य लागत आहे, ते साहित्य नागभीडला मिळत नाही. त्याची खरेदी चंद्रपूर किंवा नागपूरवरून करावी लागते. मात्र लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील दुकाने बंद असल्यामुळे साहित्य मिळण्यास अडचण येत असल्याची माहिती आहे. सद्यस्थितीत निर्माण झालेल्या बिघाडावर थातूरमातूर उपाय न करता कायमस्वरूपी उपाय करूनच योजना सुरू करावी, जेणे करून पुन्हा योजना बंद पडणार नाही, याची खबरदारी तपाळ प्रशासनाने घेण्याची मागणीसुद्धा नागरिकांकडून केल्या जात आहे.
बॉक्स
पाईपलाईन फुटणे नेहमीचेच
तपाळ पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटणे ही नेहमीचीच बाब झाली आहे. एप्रिल महिन्यातही आता ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटली आहे, त्याच्या नजिकच पाईपलाईन फुटली होती. त्यावेळीही पाचसहा दिवस तपाळ पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद होता. आता महिनाभरातच दुसऱ्यांदा ही पाईपलाईन फुटल्याने नागरिकांना पुन्हा पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. आता प्रशासन ही पाईपलाईन दुरुस्त करण्यास किती दिवस लावते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. संबंधित अधिकाऱ्यास यासंदर्भात विचारणा केली असता आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी चंद्रपूरला कर्मचारी पाठविले असल्याची माहिती दिली.