सुलेझरीजवळ निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तीन दिवसांपासून हा पाणीपुरवठा बंद असल्याची माहिती आहे. प्रशासनाने हा बिघाड त्वरित दूर करावा, अशी मागणी आहे.
आता उन्हाळा सुरू झाला आहे. सूर्य आग ओकत असल्याने प्रत्येकाची पाण्याची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत तपाळ पाणीपुरवठा योजना गेल्या तीन दिवसांपासून ही योजना बंद आहे. उल्लेखनीय बाब ही की, नागभीड येथील बहुतेक नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी तपाळ पाणीपुरवठा योजनेवरच अवलंबून आहेत. परिणामी या नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी जे काही साहित्य लागत आहे, ते साहित्य नागभीडला मिळत नाही. त्याची खरेदी नागपूरवरून करावी लागते. मात्र, लाकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील दुकाने बंद असल्यामुळे साहित्य मिळण्यास अडचण येत असल्याची माहिती आहे. सद्य:स्थितीत निर्माण झालेल्या बिघाडावर थातूरमातूर उपाय न करता कायमस्वरूपी उपाय करूनच योजना सुरू करावी, जेणे करून पुन्हा योजना बंद पडणार नाही याची खबरदारी तपाळ प्रशासनाने घेण्याची मागणीसुद्धा नागरिकांकडून केली जात आहे.
बॉक्स
येथे आहे तीव्र पाणी टंचाई
सद्य:स्थितीत नागभीड येथील प्रभाग क्र. ६ मधील मानी मोहल्ला, सिद्धिविनायक कॉलनी, विठ्ठल मंदिर बाजूचा भाग, प्रभाग क्र. ५ मधील कुरमार मोहल्ला, ठाकरे मोहल्ला, प्रभाग क्र. ४ मधील शिवनगर, आदी विविध भागांत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
बॉक्स
मिनरल वॉटरची मागणी
नागभीड येथील बहुतेक कुटुंब पिण्यासाठी तपाळ योजनेच्या पाण्याचा वापर करतात. पण, गेल्या तीन दिवसांपासून ही योजना बंद आहे. परिणामी शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून नागरिकांनी मिनरल वॉटरचा पर्याय शोधला आहे.