जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मनपा उपायुक्त अशोक गराटे, बालकल्याण समिती अध्यक्ष अॅड. वर्षा जामदार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, साहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. निशिकांत टिपले, महिला व बाल विकास जिल्हा परिविक्षा अधिकारी रमेश दडमल, स्थानिक गुन्हे शाखेच्या अपर्णा मानकर, संदीप कापडे, सामाजिक कार्यकर्ती प्रतिभा मडावी आदी उपस्थित होते. कोविड १९ संसर्गाने दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यास काळजी व संरक्षण तसेच दोन्ही पालक कोविड संसर्गामुळे दवाखान्यात दाखल असल्यास आणि बालकांना बालगृहात दाखल केले असल्यास त्यांची माहिती सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिल्या. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत कोविड संसर्गामध्ये अडचणीत सापडलेल्या शून्य ते ६ व ६ ते १८ वयोगटातील बालकांच्या मदतीसाठी जनजागृतीपर माहितीपत्रक तयार करण्यात आले. या पत्रकांचे लोकार्पण जिल्हाधिकारी गुल्हाने यांच्या हस्ते करण्यात आले.
बालकांच्या मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाइन
टास्क फोर्समधील सदस्यांची बैठक घेऊन बालकांच्या संरक्षण व काळजीबाबतच्या कामकाजासंदर्भात आढावा घेतला. नागरिकांनीही अशा बालकांची माहिती असल्यास चाइल्ड लाइन १०९८ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले.