लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मिझल्स-रुबेला लसीकरण मोहिमेतील सहभाग हा उद्याच्या सुदृढ पिढीसाठी आवश्यक आहे. या मोहिमेतला सहभाग आणि याबाबतची शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमधील जागरूकता हे आमचे राजकीय कार्य व कर्तव्य असल्याचे मत विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास सर्व शाळांकडून गोवर मोहिमेसाठी शंभर टक्के प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी झालेल्या जिल्हास्तरीय टास्क फोर्स सभेच्या बैठकीमध्ये दिली.सदर मोहिमेसंदर्भात जिल्हास्तरीय सुक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या मोहिमेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आणून उद्याच्या सुदृढ पिढी निर्मितीमध्ये अडथळा होईल, अशा पद्धतीची भावना प्रत्येक शाळेकडून व्यक्त केली जात असून चंद्रपूरसारख्या जिल्ह्यामध्ये अतिशय सकारात्मक वातावरण असल्याचेही समाधान पापळकर यांनी व्यक्त केले. जिल्हास्तरीय कृती आराखड्यानुसार १८ लाखांवर असणाऱ्या लोकसंख्येमध्ये पाच लाख १० हजार अपेक्षित लाभार्थी लसीकरणामध्ये येतात. जिल्ह्यातील २३७८ शाळांना या संदर्भात विनंती करण्यात आली आहे. ही एक मोठी मोहीम असून यामध्ये मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, पालक या सर्वांचा सहभाग मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे. काही शाळांमध्ये लसीकरणाबाबत रोटरी क्लब, लायन्स क्लब यांचेही सहकार्य घेतले जात आहे. यासाठी आशा व अंगणवाडी कार्यकर्ता, शिक्षक, समाजिक व धार्मिक संस्था शाळा व पालकांनी पुढे यावे, असे आवाहन करीत वैद्यकीय दृष्ट्या संपूर्ण काळजी जिल्हा प्रशासन घेत असल्याचे पापळकर यांनी सांगितले.बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावंकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिपेंद्र लोखंडे, लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, श्रीनिवास मुळावार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण येणारग्रामीण भागातील शाळा संस्था चालकांनी व मुख्याध्यापकांनी या मोहिमेसाठी अतिशय सकारात्मक दृष्टिकोन बाळगला आहे. शहरी भागात तर अनेक प्राचार्यांनी मुख्याध्यापकांनी या मोहिमेमध्ये आमच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी, त्याचे पालक व शिक्षक यांना महत्त्व समजून सांगितले आहे. उद्याच्या सुदृढ भारतासाठी या लसीकरण मोहिमेला आमचा पाठिंबा असेल, असे शाळा स्तरावर सांगितले जात आहे. शाळास्तर व सामाजिक स्तर या दोन्ही स्तरावर चार आठवडे ही मोहीम २७ नोव्हेंबर नंतर राबविली जाणार आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील लसीकरण हे शंभर टक्के यशस्वी होईल अशी आपणास खात्री असल्याचेही त्यांनी यावेळी उपस्थित सर्व विभागप्रमुखांना स्पष्ट केले.
रुबेला लसीकरण मोहिमेसाठी टास्क फोर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 10:41 PM
मिझल्स-रुबेला लसीकरण मोहिमेतील सहभाग हा उद्याच्या सुदृढ पिढीसाठी आवश्यक आहे. या मोहिमेतला सहभाग आणि याबाबतची शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमधील जागरूकता हे आमचे राजकीय कार्य व कर्तव्य असल्याचे मत विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केले आहे.
ठळक मुद्देजि.प. च्या कार्यशाळेत नियोजन : सर्व शाळांची सहमती