लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उन्हावर मात करण्यासाठी नागरिक विविध साधनांचा वापर करतात. शरीराला गारवा देणाऱ्या साधनांत आंब्याचाही समावेश आहे. नागभीड शेजारी असलेले डोंगरगाव आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंब्यांची नागभीडकरांना उन्हाळ्यात भुरळ पडते, मात्र यावर्षी येथील आंब्यांच्या झाडांना फळधारणाच झाली नसल्याने नागभीडकरांना डोंगरगावच्या आंब्यांच्या लज्जतीपासून वंचित राहावे लागणार आहे.आंब्याच्या कैऱ्या असो की, परिपक्व झालेले आंबे, पिकलेले आंबे, प्रत्येकालाच ते हवेहवेसे वाटतात. आंबे जरी हवेहवेसे वाटत असले तरी, झाड लावण्याची सवड कोणाजवळच नाही. त्यामुळे ग्रामीण भागात हा रानमेवा हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र डोंगरगावच्या काही शेतकऱ्यांनी या आंब्याला व्यावहारिक रूप देऊन या झाडांचे संगोपन केले. आंब्याचे गांव अशी डोगरगावची आता ओळख निर्माण झाली आहे.डोंगरगांव येथील उमेश दिनकर पाथोडे, शिवदास रामदास पाथोडे, अशोक लहानू पाथोड, अजय हिरामन कोसे यांनी आपल्या शेतात रत्ना, दशेरी, लंगडा, केशर या प्रजातीच्या आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. या शेतकऱ्यांकडे १५० च्या आसपास आंब्याची झाडे आहेत. या शेतकºयांनी उत्पादित केलेले आंबे एवढे दर्जेदार असतात की , डोंगरगावचे आंबे बाजारात केव्हा येतात, याची उत्सुकता येथील नागरिकांना असते.आंब्याचे गाव म्हणून ओळख
उन्हाळ्यातील काहिलीला काबूत ठेवण्यासाठी रामबाण उपाय म्हणून आंब्याकडे पाहिले जाते. डोंगरगाव हे गाव नागभीडपासून पाच किमी अंतरावर आहे. गावाची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर आहे. धान पिकासोबतच भाजीपाल्याच्या उत्पादनासाठीही हे गाव प्रसिद्ध आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षात डोंगरगाव दर्जेदार आंब्यांमुळे चर्चेत आले आहे. एवढेच नाही तर हे गाव आंब्याचे गाव म्हणून ओळखले जाते.
ग्राहक गावात जाऊन करतात खरेदीआंबा पाडाला आला की, या आंबा उत्पादकांचे जे नेहमीचे ग्राहक आहेत ते ग्राहक फोनवरूनच आपल्याला किती आणि केव्हा आंबे लागतील याची सुचना देतात. त्याचबरोबर उर्वरित आंबे या उत्पादकांनी नुसते रस्त्याने फिरविले तरी हातोहात विक्री होतात.बाजारातील रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकविलेल्या आंब्यांपेक्षा डोंगरगावचे आंबे केव्हाही बरे, अशा आंबाशौकिनांच्या प्रतिक्रिया आहे. अनेकजण तर डोंगरगावला जाऊन आंबे खरेदी करतात.