विनायक येसेकरलोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : महावितरण कंपनीने ग्रामपंचायतीच्या पथदिव्याचे कनेक्शन कापल्याची चर्चा व त्यावरून उठलेले वादंग तसेच शासन व प्रशासनाने जाहीर केलेल्या भूमिका यासंबंधीच्या वृत्ताची शाई ताजी असतानाच भद्रावती तालुक्यातील भामडेळी ग्रामपंचायतीने महावितरण कंपनीवर १७ लाख रुपयांची कर आकारणी केल्याचे वृत्त समोर आले आहे. येत्या १५ दिवसात ग्रा.पं. कार्यालयात कर जमा करण्याची सूचना देण्यात आली आहे. भामडेळी ग्रा.पं. च्या ८ ऑगस्ट २०२१ च्या मासिक सभेत या कर आकारणीचा ठराव सर्वसंमतीने पारित केला.या ठरावाच्या सत्यप्रत यासह १७ लाख रुपयांची कर वसुली करीत असल्याबाबतचे निवेदन अलीकडेच २८ ऑगस्ट रोजी येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता संतोष लोहे यांना देण्यात आले आहे.यावेळी भामडेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच शामल नन्नावरे, ॲड. अमोल जीवतोडे व भद्रावती तालुका ग्रामसंवाद सरपंच संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायत भामडेळीच्या सरपंच सुषमा जीवतोडे यांच्या अध्यक्षतेखाली ८ ऑगस्ट २०२१ रोजी पार पडलेल्या मासिक सभेत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या इलेक्ट्रीक पोल व डीपी इत्यादीवर गेल्या २० वर्षांपासूनचा कर आकारणे या विषयान्वये ठराव क्रमांक ६ / १ सर्वसंमतीने पारित करण्यात आला. या ठरावाचे सूचक उपसरपंच शामल नन्नावरे तर अनुमोदक ग्रा.पं. सदस्य विजय भोपरे आहेत.
परवानगी न घेताच उभे केले वीज खांबया ठरावात असे नमूद करण्यात आले की मौजा भामडेळी येथे २० वर्षांपासून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने गावामध्ये, गावठाण हद्दीत व शेतजमिनीमध्ये विनापरवाना व कोणताही मोबदला न देता ईलेक्ट्रीक पोल व डी.पी. उभ्या केल्या आहे. त्यासाठी कंपनीने गावठाण व शेतजमिनीमधील जागेचा वापर केला आहे. यासाठी ग्रा.पं.कडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. परवानगी घेतली असल्यास ग्रा.पं.ला संबंधित कागदपत्रे विनाविलंब सादर करावी. आपल्या गावात महावितरण कंपनी व्यवसाय करून नफा मिळवित आहे. म्हणून ग्रा.पं.ने महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रीक पोल व डी.पी.वर कायदेशीर मार्गाने कर आकारणी करावी. २० वर्षांपासून आजपर्यंतची कायदेशीर मार्गाने करवसुली करण्यात यावी, असे या ठरावात नमूद आहे.
असे आकारले करमहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १२४ व कर व फी नियम ६६ भाग ब अन्वये महावितरण कंपनीवर पुढीलप्रमाणे कर आकारणी करण्यात आली. इलेक्ट्रीक पोल ४६ नग, प्रती नग एक हजार रुपये असे एका वर्षाचे ४६ हजार रुपये आणि २० वर्षाचे एकूण ९ लाख २० हजार रुपये. डी.पी. ३ नग, प्रति नग ५ हजार रुपये असे एका वर्षाचे १५ हजार रुपये आणि २० वर्षाचे एकूण तीन लाख रुपये. व्यवसाय कर प्रति वर्ष २४ हजार रुपये असा एकूण २० वर्षाचे १७ लाख रुपये कराची आकारणी केली आहे.