दीपक साबने
जिवती (चंद्रपूर) : एकीकडे इंग्रजी शाळेच्या पसाऱ्यामुळे मराठी शाळा एकेक करून बंद होऊन जि.प. शाळांतील उपस्थिती कमी होत आहे. असे असताना अतिदुर्गम, आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील पालडोह येथील जि.प.शाळेत चक्क प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी असते. याचे कारणही तसेच आहे. राजेंद्र उदेभान परतेकी नामक शिक्षक कधीच शाळा बंद ठेवत नाही. राज्यात एकमेव ३६५ दिवस चालणारी शाळा म्हणून या शाळेची महती आता सर्वदूर पसरली असून या शाळेने राज्यात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
राजेंद्र परतेकी या आदर्श शिक्षकाने या शाळेसाठी सर्वस्व पणाला लावले आहे. शाळेत आणि विद्यार्थ्यांच्या अध्यापनात ते कधीही खंड पडू देत नाहीत. वर्ग ४ पर्यंत असलेली शाळा आता वर्ग ८ पर्यंत झाली आहे. वर्ग ९ व १० करिता प्रशासकीय पातळीवर त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे विद्यार्थ्यांत गुणात्मक बदल झाले. २२ असलेली पटसंख्या १५० वर पोहोचली. रविवारी आणि इतर सणांच्या सुटीतही ही शाळा सुरू असते आणि विद्यार्थीही शाळेत तेवढ्याच उत्साहाने येतात. अशा सुटीतल्या दिवशीतील शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात, मनोरंजनात्मक कार्यक्रमही आयोजित केले जातात.
सहा वर्षे खोदले पहाड
परतेकी यांनी स्वतः गावातून कुदळ, पावडे जमा करून विद्यार्थ्यांच्या मदतीने सलग सहा वर्षे पहाड खोदून शाळेसमोरील जागा समतल बनविली. ओसाड वाटणाऱ्या शाळेचे लोकसहभागातून आज नंदनवन करून एखाद्या खासगी शाळेला लाजवेल असे उदाहरण परतेकी यांनी उभे केले आहे. मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, कौशल्य आधारित शिक्षण, तंत्रज्ञान आत्मसात करून देशाची भावी पिढी घडविण्याचा मानस डोळ्यासमोर ठेवून राजेंद्र परतेकी यांनी ३६५ दिवस शाळा अविरतपणे सुरू ठेवून राज्यात एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. शाळेत ‘शाळाबाह्य मुले दाखवा व एक लाख रुपये मिळवा’ असा फलकसुद्धा लावलेला आहे.
शाळेत राबवीत असलेले उपक्रम
पहाटे ०४:३० ते ०७:०० पर्यंत मैदानी ॲथलेटिक तयारी करणे. रोज सकाळी ०९:०० ते १०:०० पर्यंत पूरक मार्गदर्शन विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी. एक तासाचा आदर्श परिपाठ ज्यात २२ मुद्द्यांचा समावेश. आठवड्यातून पूरक मार्गदर्शन वर्गावर विद्यार्थ्यांसाठी चाचणीचे नियोजन. वर्षात येणारे प्रत्येक भारतीय सण विविध स्पर्धांच्या माध्यमातून साजरे केले जातात. दर रविवारला सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन व अनेक उपक्रम राबविण्यात येतात.
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
आदर्श शिक्षक राजेंद्र परतेकी व पालडोह शाळेची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘कोणत्याही सुटीविना ३६५ दिवस सुरू राहणारी शाळा’ असा उल्लेख मागील वर्षी ५ सप्टेंबर २०२२ ला या शाळेविषयी माध्यमांशी बोलताना केला होता.