मार्च महिन्यापासून राज्यात कोरोनाचा कहर सुरु झाला. प्रशासनाने प्रभावी उपाययोजना राबवायला सुरुवात केली. दरम्यान, लाॅकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून शाळा पूर्णपणे बंद झाल्या.
यामध्ये दहावीचा पेपरसुद्धा होऊ शकला नाही. यावर्षी पहिल्यांदाच दहावीचा पेपर रद्द करण्याची वेळ परीक्षा मंडळावर आली. तर पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या. अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्या लागल्या.कोरोनाचे संकट वाढत असल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही कामाला लावण्यात आले. प्रथम जिल्हा सिमांवर वाहन तपासणीचे काम पोलिसांसोबत करण्याची मोठी जबाबदारी त्यांना देण्यात आली. त्यानंतर विविध सर्व्हेक्षण करण्याचेही काम त्यांना करावे लागले. हेच काम नाही तर माझे कुटुंब माझी जबाबदारीचेही त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. या सर्वामध्ये त्यांची चांगलीच गळचेपी झाली. सामान्य नागरिक घरी असताना शिक्षकांना मात्र यावेळी घरोघरी जावून विचारपूस करावी लागली.
दरम्यान, दहावी, बारावीची उत्तर पत्रिका तपासून शिक्षकांनी आपली जबाबदारी पार पडली. विशेषत: वार्षिक मुल्यांकन आणि ऑनलाईन परीक्षेतील गुणांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरही घरघोस गुण दिसून आले. यावर्षी जिल्ह्याचा दहावी तसेच बारावीच्या निकालाची टक्केवारीही मोठ्या प्रमाणात वाढली.
कोरोनाचे संकट असतानाही शिक्षकांनी जीवाची पर्वा न करता कोरोना योद्धा म्हणून आपली जबाबदारी पार पडली. यामध्ये जिवती तालुक्यातील एका शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला. अनेक शिक्षक कोरोना बाधित झाले. तर काहींची चेकपोस्टवर ड्यूटी लावण्यात आली. एवढेच नाही तर बाहेर राज्यातील तरेच इतर जिल्ह्यातून येणाऱ्यांची नोंदणी, गृहविलगीकरणातील व्यक्तींवर लक्ष ठेवणे, नागरिकांचे आरोग्य तपासणी, विनापरवानगीने येणाऱ्यांवर वाॅच ठेवणे, कटेन्मेंट झोनमध्ये कार्यरत, सारी सर्व्हेक्षण यासोबतच शैक्षणिक बाबतीतही ऑनलाईन व ऑफलाईनची कामे, नेतृत्व प्रशिक्षण, प्रगत शैक्षणिक, दीक्षा ॲप, ऑनलाईन शिक्षकांचे प्रशिक्षण, शिष्यवृत्ती परीक्षा नोंदणी, ऑनलाईन-ऑफलाईन काम, स्वाध्याय प्रशिक्षण व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घेणे आदी कामे करावी लागत आहे.
दरम्यान, आता नववी ते बारावीपर्यंत वर्ग सुरु करण्यात आले आहे. मात्र कोरोना तपासणीमध्ये अनेक जण बाघित निघाले. काही पालकांनी अद्यापही पाल्याने शाळेत पाठविणे सुरु केले नाही. शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांच्याकडून हमीपत्र भरून घेणे, शाळेत सामाजिक अंतर पाळण्यासह शाळेचा परिसर व वर्ग खोल्यांचे निर्जुंतुकीकरण करणे, सॅनिटॅयझर, व्हॅन्डवाॅश आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावरही भर देण्यात येत आहे.
दरवर्षी शिक्षकांना शाळाबाह्य मुलांचा शोध घ्यावा लागतो. यासोबतच मतदार याद्या तसेच शासकीय इतरही कामे करावी लागते. मात्र कोरोनाकाळात यावर्षी प्रथमच शिक्षकांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. दरम्यान, काही शिक्षक संघटनांनी यासाठी विरोधही केला. मात्र शाळा सुरु नसतानाही वेतन मिळत असल्यामुळे अनेकांनी निमुटपणे प्रशासनाने दिलेले काम करणे पसंत केले. कोरोनामुळे असे अनेक बदल यावर्षीही पहिल्यांदाच बघायला मिळाले.
बाॅक्स
काॅन्व्हेंट शिक्षकांचे वेतन अडले
कोरोना काळात खासगी इंग्रजी शाळांच्या शिक्षकांची मोठे आर्थिक नुकसान झाले. काही शाळांनी त्यांना वेतन दिले तर काही शाळांनी अर्धेच वेतन दिले. अनेक छोट्या शाळा प्रशासनाने वेतनसुद्धा दिले नाही. त्यामुळे या शाळांतील शिक्षकांना दुसरे काम शोधण्याची वेळ कोरोना संकटामुळे आली. विशेष म्हणजे, ऑनलाईन शिक्षणाचा अनुभव नसतानाही अनेकांंना ऑनलाईन शिकविण्याचे प्रशिक्षण घेऊन ते काम सुरु केले. मात्र कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या मोठे आर्थिक संकटच आहे.
---
संस्थाध्यक्षांनी दिले निवेदन
खासगी शाळांतील वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर खासगी शाळेतील संस्थाचालकांनी प्रशासनाला निवेदन देवून या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. दरम्यान, पालकांनीही फी देणे बंद केल्यामुळे अनेक शाळांचे आर्थिक चक्र कोलमडले. त्यामुळे अनेक संस्थाध्यक्षांनी वेतन देणे बंद केले.
----
शाळा प्रशासन पालकांमध्ये संघर्ष
कोरोनामुळे यावर्षी प्रत्येकांचेच अर्थचक्र बिघडले. दरम्यान, शाळाच नाही त्यामुळे फी नाही, असे धोरण काही पालकांनी अवलंबिले. त्यामुळे शाळा प्रशासन आणि पालकांध्ये संघर्षही झाला. हा संघर्ष टोकालासुद्धा गेला. तर काही ठिकाणी फि फरली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविलेही बंद केल्याचा प्रकार झाला.
---
ग्रामीण भागातही ऑनलाईन शब्द रुळला
शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला. दरम्यान, शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन शिक्षण हा शब्द चांगलाच रुळला. अनेक पालकांना ॲन्ड्राईड मोबाईल घ्यावा लागला. तर काही पालकांकडे हा मोबाईल नसल्यामुळे शिक्षकांनी घरोघरी जाऊन शिकविणे सुरु केले. यामध्ये मात्र पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनाही त्रास सहन करावा लागला.
--
ग्रामीण पालकांची चिंता वाढली
ग्रामीण भागात बहुतांश पालक पाल्याने शाळेत सोडून शेतीच्या कामावर जातात. मात्र यावर्षी शाळा सुरुच झाली नसल्याने पालकांची पाल्यांना ठेवण्याची चिंता वाढली. मुले गावभर रस्त्याने फिरत असून अपघात तसेच अन्य घटना होण्याची त्यांना भिती आहे. मात्र नाईलाजाने त्यांना पाल्यांना गावात सोडून शेतात जावेच लागत आहे. त्यामुळे शाळा सुरु करावी, अशी मागणी पालकांची अनेक महिन्यापासून आहे.
कोट
कोरोना महामारीच्या काळात पोलीस, प्रशासन व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षक कार्यरत होते. जीवाची पर्वा न करता कंटेन्मेंट झोन मधील सर्व्हे असो, पोलिसांसारखा पहारा असो, वा टेम्प्रेचर, ऑक्सिमिटर तपासणी असो, यापैकी कुठल्याच कामाचा अनुभव नसतांना त्यांनी प्रशासनाच्या हाकेला ओ देत आपले कर्तव्य पार पाडले.
-हरीश ससनकर
राज्य सरचिटणीस
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती
--
कोरोनाच्या संकटामुळे शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. ऑनलाईन अभ्यासाद्वारे विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनाकाळात इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही प्रशासनाने दिलेली जबाबदारी चोखपणे जबावली.
-जे.डी.पोटे
शिक्षण समिती सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपूर