लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांपासून शाळा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेपासून नाते तुटण्याची स्थिती निर्माण झाली. मोबाईल सुविधा नसणारे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. मात्र, भद्रावती तालुक्यातील पिरली येथील मुख्याध्यापक देविदास सांगळे यांच्या संकल्पनेतून शालेय पोषण आहार अंतर्गत स्वंयपाक शिजवणाऱ्या दुर्गा सपाट यांनी आपल्या दोन मुलांच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी स्वत:च्याच घरीच शाळा सुरू केली.
अमित सपाट व प्रतीक्षा सपाट हे दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. दुर्गा सपाट यांनी स्वत:च्या घरी शाळा भरविण्यास सुरूवात केली. दररोज ५३ विद्यार्थी अभ्यास करत आहेत. सकाळी सात ते पाच वाजेर्यंत शारीरिक अंतर ठेवून प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांच्या गटाने शिक्षण घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात वर्गाचे वेळापत्रक तयार करण्यात आले. विद्यार्थ्यांकडून वेळेचे काटेकोर पालन केले जात आहे. पहिली ते चौथा वर्ग सकाळी सात ते दहा वाजता तसेच पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजता अध्यापनाचे काम सुरू आहे. या वेळेमध्ये विद्यार्थ्यांच्या वर्गानुसार प्रत्येक विषयाचे अध्यापन केले जाते. या शाळेची दखल घेवून पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धनपाल फटिंग, विस्तार अधिकारी विजय भोयर, केंद्रप्रमुख माया जुनघरे यांनी भेट दिली. उपक्रमासाठी सर्व शिक्षकांकडून सहकार्य लाभत आहे.१७ मार्च २०२० पासून सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, यासाठी गावातील पहिली ते सातवीपर्यंत शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांचा मी व माझा भाऊ दररोज अभ्यास घेतो. कोरोनाची बाधा होवू नये, यादृष्टीने सुरक्षित अंतर ठेवून दोन तास नियमित वर्ग सुरू आहेत.- प्रतीक्षा सपाट,महाविद्यालयीन विद्यार्थिनी, पिरली