चंद्रपूर : शिक्षकांचा शैक्षणिक, सामाजिक तसेच राष्ट्रीय कार्यासाठी सन्मान व्हावा, त्यांना शैक्षणिक कार्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर शिक्षकांना शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी पुरस्कार दिल्या जातो. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी शिक्षण विभागाने शिक्षकांकडून पुरस्कारासाठी प्रस्ताव मागितले आहे. मात्र शिक्षकांची पुरस्कारासाठी उदासीनता बघता १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची नामुष्की शिक्षण विभागावर आली आहे.
जिल्ह्यात पंधराही पंचायत समितीमधून प्रत्येकी एक आणि अपंग विभागातून एक आणि हायस्कूल विभागातून एक अशा १७ शिक्षकांची निवड जिल्हा पुरस्कारासाठी केली जाते. सध्या जिल्ह्यामध्ये ५ हजारांवर शिक्षक असून अनेक शिक्षक सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यात गुंतले आहे. मात्र पुरस्कारासाठी असलेल्या अटी तसेच शर्तींमुळे ते प्रस्तावच दाखल करीत नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी तत्कालीन सीईओ राहुल कर्डिले यांनी शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करताना मुलाखत तसेच पीपीटीद्वारे सादरीकरणाचा नियम सुरु केला. त्यामुळे इच्छा असतानाही काही शिक्षकांनी पुरस्काराची अर्जच सादर केला नाही. यावर्षी ही १० ऑगस्टपर्यंत एकाही शिक्षकांनी पुरस्कारासाठी अर्जच केला नसल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी मुदतवाढ दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.
बाॅक्स
या आहे अटी
शिक्षकांवर गुन्हा दाखल नसल्याबाबत प्रमाणपत्र, शिक्षकांचे हमीपत्र, मुख्यालयी राहत असल्याचे बाबत प्रमाणपत्र, प्रस्ताव स्पयरल बाईडिंग करून सादर करावे, तीन वर्षांचे गोपनीय अहवाल, शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबाबत माहिती, मागील तीन वर्षातील स्वत: अध्यापन केलेल्या वर्गाच्या प्रगतीचा व शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांबाबत माहिती. प्रस्ताव साक्षांकित केलेले असावे.
बाॅक्स
प्रशासनानेच घ्यावी दखल
जिल्हा परिषदेद्वारे ५ सप्टेंबर रोजी शिक्षकांना पुरस्कार दिल्या जातो. जिल्ह्यातील शिक्षकांची अद्यावत माहिती शिक्षण विभागाकडे असते. त्यामुळे पुरस्कारासाठी अर्ज न मागता शिक्षकांचे कार्य बघून त्या शिक्षकांनाच पुरस्कार द्यावा, अशी मागणीही काही शिक्षकांनी केली आहे.
बााक्स
असे आहे निकष
आवश्यक शैक्षणिक अर्हता पेक्षा पुढचा टप्पा असावा, शैक्षणिक संशोधनपर निबंध असावे,वृत्तपत्रात पाच लेख (वैचारिक किंवा विश्लेषणात्मक) प्रकाशित झालेले असावे, शिक्षक शिकवत असलेल्या वर्गातील विद्यार्थ्यास कला, विज्ञान, स्काऊट गाईड वक्तृत्व या क्षेत्रात पुरस्कार मिळाले असावे, जनगणना, पल्स पोलिओ, कुटुंब कल्याण, अल्प बचत राष्ट्रीय कार्यात काम असावे.